Wednesday, January 17, 2007

कै.शिवाजी सावंत यांची "युगंधर

कै.शिवाजी सावंत यांची "युगंधर"ही कलाकृती माझ्या वाचण्यात आली. त्यांचे छावा आणि मृत्युंजय मला आवडले होते. त्यामुळे या पुस्तकाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या. पुस्तकाने त्या पुर्ण केल्या यात शंका नाही. तेव्हापासून त्याविषयी काही लिहावे असे मनात होते. माझ्या मनाला भावलेले व मनोगतींना दाखवावेसे वाटलेले मी येथे लिहीणार आहे. या महान ग्रंथावर भाष्य करण्याची वा त्याची समीक्षा करण्याची माझी पात्रता नाही याची मला पूर्ण जाणीव आहे.
युंगधरमध्ये भगवान श्रीकृष्णाचे जीवन सामान्यापुढे उलगडून त्याला साहित्य, विज्ञान आणि इतिहासाच्या पाटीवर तावून सलाखून घेण्याच काम शिवाजी सावंतांनी केले आहे. त्याकरता त्यांनी भारतभर केलीली भ्रमंती आणि उपयुक्त दाखले आणि छायाचित्रे दिली आहेत. हे सर्व शिवाजी सावंताच्या शोधक वृत्तीचे प्रतीक आहे .आजच्या विज्ञानयुगात भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा वेध घेताना त्यात कुठेही भावूकपणाची छ्टा आढळत नाही. १००० पानी ग्रंथातील प्रत्येक ओळ सावंतांच्या मराठी भाषाप्रभुत्वाची बोलके उदाहरण आहे. युगंधर वर चार भागात लिहायचा विचार आहे. त्यावेळी मी जमेल तेवढा साहित्यिक दृष्टीने आढावा घेणार आहे त्याकरता मला आवडलेली वाक्ये पुस्तकातून जशीच्या तशी लिहीणार आहे. अर्थात मला आवडलेले सगळे आपल्याला भावेल असे मुळीच नाही. आता थोडेसे पुस्तकाच्या मांडणी विषयी. मनोगतावर रसिक आणि साहित्याची आवड असणारी मंडळी आहेत त्यांच्याकरता सांगायचे तर मृत्यंजयाच्या साच्यात युगंधराची आखणी केली आहे. ग्रंथाची सुरुवात प्राचीन अश्वत्थ वृक्षाच्या तळी पहुडलेल्या श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेने होते. त्यानंतर रुक्मिणी, दारुक, द्रौपदी, अर्जुन, सात्यकी व उद्धव अशाक्रमाने व्यक्तीरेखा त्यांचे व श्रीकृष्णाचे नाते उलगडून दाखवतात. हे वाचल्यानंतर राधेचे नाव स्वतंत्र कसे नाही हा प्रश्न मनात येणे अगदी स्वाभाविक आहे. साहित्यात वेगवेगळ्या भाषेत शृगाररसप्रधान खंडकाव्यातून राधा जनमानसात आली. परंतु शिवाजी सावंतानी राधेला प्रातिनिधिक गोपस्री म्हणून घेतली आहे. आपल्या गोकुळाच्या आठवणी सांगताना श्रीकृष्णाच्या तोंडी राधेचा-प्रिय गोप सखीचा उल्लेख आहे. राधा या जोडशब्दाचा अर्थ मोक्षासाठी तळमळणारा जीव असा आहे.राधेबरोबर रास खेळणारा श्रीकृष्ण म्हणतो" मी आणि राधा राधा आणि मी गोप आणि गोपी पूर्ण उन्मनी झालो होतो.राधाकृष्ण ही दोन शरीरे उरली नव्हती." पुढे श्रीच म्हणतात"स्री ही विधात्याची निकोप प्रेमाची कसली वासनारहीत संस्कारशील कलाकृती आहे याची गुरुदक्षिणा राधेने मला दिली, बारीक सारीक सर्व मात्रांसह.खरच राधा माझी पहिली स्त्री गुरु होती."
आता भगवान श्रीकृष्णाचे सावंतांनी वर्णन केले आहे ते असे"माझ्या कंठात पांढर्‍याशुभ्र फ़ुलांची, मध्येच हिरव्याकंच पानांचे कलाश्रीमंत गुच्छ गुंफ़लेली टवटवीत "वैजयंतीमाला" विसावलेली आहे.तिला घेरून कौस्तुभमणीधारी कंठेच कंठे आणि कितीतरी सुवर्णी अलंकार छातीवर रुळताहेत....माझ्या झळझळीत पीतांबरावर अश्वत्थाची पान चुकवून उतरलेले सूर्यकिरणांचे काही चुकार कवडसे ऐस पैस पसरलेत.त्यामुळे हे पीतांबर कस अंगभर झळझळून उठल आहे....माझ्या अथक आणि उदंड भतकंती केलेल्या या चक्रवर्ती तळव्यातच "जरा"नावाच्या व्याधान नुकताच सोडलेला, खोलवर रुतलेला एक सुची बाणही मला स्पष्ट दिसतो आहे!......उजव्या पायाच्या टाचेशी दाटलेलं माझ्याच दुर्लभ, उष्ण रक्ताच थारोळहि पसरलेल मला दिसत आहे. रक्त ! खरच रक्त म्हणजे असत तरी काय?तो असतो चैतन्याने अखंड काळाला साक्षी ठेवून दिलेला संस्कारशील हुंकार! पिढ्यानपिढ्याच्या दिर्ध साधनेच्या संस्कारशील वाटचालीन लाभलेला.
युगंधर मध्ये मथुरेचे सुंदर वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे द्वारकेची निर्मिती, हस्तिनापूर तसेच मयासुराने बांधलेली पांडवांची राजनगरी यांचे वर्णन करतांना आपल्याला सावंतांचे शब्दसामर्थ्य कळते. ही नगरे वाचकांच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहतात असे म्हटले तर वावगे ठरू नये. श्रीकृष्णाला मिळालेले प्रत्येक रत्न आणि त्यासाठी केलेले प्रयत्न, युध्दे याची वर्णनेही वाचनीय आहेत. आचार्य सांदिपनींच्या आश्रमातील विद्याथीदशेतल्या श्रीकृष्णाचे १४ विद्या आणि ६४ कलांचे अध्ययन व त्याअनुशंगाने येणारे प्रश्न आणि उत्तरे म्हणजे वाचकांना पर्वणीच यात काही शंका नाही. गोमंत पर्वतावरील वास्तव्य,भगवान परशुरामांची व श्रीकृष्णाची भेट, सुदर्शनचक्राची प्राप्ती, जरासंधाबरोबर केलेले युद्ध ही सर्व वर्णने पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात.
आपल्या पत्नीचे रुख्मिणीचे वर्णन करतांना श्रीकृष्णाच्या मुखी सावंतांनी पुढील वाक्ये आपल्या शैलीत लिहीली आहेत."पूर्ण उमललेया चंद्रविकसी कुमुदकमळासारखी दिसत होती तिची चर्या! उत्सफ़ुल्ल, यौवनरसरशीत. माझ्या रथाच्या दंडावरचा सुवर्णी गरुडध्वज बघताच तिची चर्या कशी आनंदोर्मीन फ़ुलून आली. लाख लाख सुवर्णी गरुडपक्षीच जसे काही मैनाकपर्वत शिखरासारख्या उन्नत दिसणार्‍या तिच्या प्रसन्न चर्येवर उतरले. ......ती आली !उन्हात उजळलेली अंबिका मंदिराची एक एक श्वेत पायदंडी धिमेपणाने उतरत, चालत संगमरवरी शिल्पासारखी! शरदातल्या प्राजक्तगंधित टवटवीत पहाटेसारखी! आषाढाच्या प्रारंभी सावळ्या मेघमालेत तळपून उमटणार्‍या वीजरेघेसारखी. ......दुसर्‍याच क्षणी तिचे काळेभोर, टपोरे तरीही अरागस डोळे माझ्या मस्तकीच्या मोरपंखाला भिडले!त्याच्या हव्या हव्याशा नितळ आवाहक रंगच्छटात जसे खिळूनच पडले!...
रुख्मिणीच्या सौंदर्याचे वर्णन जसे सावंतांनी केले आहे तसेच श्रीकृष्णाच्या तोंडी वारंवार तिच्या बुद्धिमत्तेचे कौतुकही त्यानी वर्णन केले आहे. रुख्मिणीच्या बुद्धिमत्तेचा पहिला दाखला म्हणजे तिने श्रीकृष्णास लिहीलेल्या पत्र होय. आपल्या जीवनसखीचे केवळ सौंदय न पहात तिच्या बुद्धिमत्तेकडे आदराने पहाण्याची श्रीकृष्णाची दृष्टी आजही समाजाला मोठी शिकवण देते आहे. श्रीकृष्णाच्या शब्दात सांगायचे तर"ती जशी अनुपम सौंदयवती होती तशीच अजोड बुद्धिमानही होती. ...रुख्मिणीच्या आगमनाने माझ्या जीवनातील रंगीविरंगी 'संसारपर्व'सुरु झाल होत....रुख्मिणीच्या आगमनानं माझी भावद्वारका नाना भावगंधांनी रंगछटांनी कशी अंगभर खुलून गेली- 'ऋतुस्नात' झाल्याप्रमानं!तिच्यावर एक आगळीच 'नव्हाळी' चढली!! येथे सावंतांनी श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा रुक्मिणीच्या व्यक्तिरेखेशी जोडून पुढचे पर्व सुरु केले आहे.

रुख्मिणी आपले अन श्रीकृष्णाचे जीवन उलगडून दाखवताना रुख्मिणी म्हणते की श्रीकृष्णाचे जीवन द्वारकेला घेर करुन असलेल्या सागरासारखे आहे आणि त्याच्या अविरत लाटांसारख्या आहेत माझ्या मनात अनंत स्मृती. स्मृतींच्याही आहेत अगणित लाटा...या लाटा सांगतांना माझी तारांबळ उडते आहे. जस जमेल तस आठवेल असे मी हे क्रमाने मन:पूर्वक सांगणार आहे. शिवाजी सावंतांनी रुख्मिणी या व्यक्तीरेखेद्वारे स्त्रीच्या मनातील विविध भावनांना योग्य शब्दात वाट करुन दिली आहे. त्याकाळात रूढ असणारी बहुपत्नीत्वाची पद्धत आणि त्यामुळे थोरली महाराणी या नात्याने करावि लागणारी तडजोड, धाकट्या राण्यांना मार्गदर्शन, पतीची विभागणी हे सारे करतांना सात्विक स्वभावाच्या रुख्मिणीची होणारी घालमेल त्यांनी विविध प्रकारे उत्तमोत्तम दाखले देवून आणि रुक्मिणीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करून टिपली आहे. तेवढ्याच ताकतीने त्यांनी आपल्या शक्तीची जाणीव झालेल्या रुख्मिणीने ज्या खंबीरपणे श्रीकृष्णाला साथ दिली, त्याच्या अनुपस्थितीत सून म्हणून व थोरली महाराणी आणि माता म्हणून आपल्या कर्तव्यात कुठेही कसर ठेवली नाही हे ही दाखवले आहे. आपल्या पतीची दिनचर्या रुख्मिणीने नेमक्या शब्दात सांगितली आहे.रुख्मिणीची व्यक्तीरेखा वाचकांसमोर स्मयंतकमण्याचे नाट्य,नरकासुराचा वध, कामरुप देशातील सहस्र स्रीयांची मुक्त्तता आणि द्रौपदी स्वयंवर यांचा विस्तृत वेध घेते. रुख्मिणीच्या व्यक्तिरेखेत पांडवांचा आणि त्या ओघाने आलेल्या घटनांचा उल्लेख आहे. द्रौपदीस्वयंवरचे आमंत्रण बघून रुख्मिणीने पाचवी सवत म्हणून तिला स्विकारण्याची तयारी ही गोष्ट जरा वेगळी वाटते परंतु आपण तेथे का जातो आहोत हे त्यांना श्रीकृष्णाने न सांगितल्याने त्यांनी केलेल्या विचारात काही काही गैर वाटत नाही. अर्जुनाने स्वयंवराचा पण जिंकल्यावर भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात "ही माझी तिसरी भगिनी!" आणि ते "प्रातिवत्याच्या शिखराला जाशील असा आशीर्वादही द्रौपदीला देतात". रुख्मिणीशी निगडीत घटना म्हणजे श्रीकृष्णाच्या तिच्याशिवाय सात पत्नी आणि त्या सर्वांना झालेली अपत्यप्राप्ती, त्यांची नावे , स्वभाववैशिष्टे यांचे वर्णन याच पर्वात सावंतांनी केले आहे. त्याचबरोबर सुदामाभेट,सुभद्राहरण यांचेही या पर्वात वर्णन सावंतांनी आपल्या ओघवत्या, रसाळ शैलीत केले आहे. दारुक युगंधरातील तिसरी व्यक्तिरेखा आहे दारुकाची,भगवान श्रीकृष्णांच्या सारथ्याची. दारुक म्हणतो"एखादया कसदार चित्रकारानं सुरेख रंगसंगतीच आकर्षक चित्र रेखाटाव. भवतीच्या अवघ्या विश्वानं ते डोळे विस्फ़ारत थक्क होऊन बघाव तसच माझ्या स्वामींच जीवनकार्य ठरलं. अस चित्र रेखाटतांना चित्रकाराच्या कुंचल्यातून त्याला नकळतच चारदोन रंगतुषार बाजूला इकडतिकड उडावेत तेच ओंजळीत झेलून घेऊन मी हे सांगतो आहे.""कुंभातून ओतल्यासारखा धो धो, सरळ कोसळणारा मुसळधार,वायुलहरींवर हिंदकळत उतरता रिमझिमता, मध्येच थांबणारा, पुन्हा कोसळणारा, उन्ह पावसाचा खेळ खेळणारा श्रावणी, अशा पर्जन्याच्या अ‌संख्य लयी असतात. एकीसारखी मात्र दुसरी कधी असते का?नाही. तसचं आमच्या द्वारकाधीश महाराजांचं जीवन होत. त्यानंतर दारुकाने जरासंधाबरोबर झालेले भीमाचे द्वंद्व युध्दाचे वर्णन केले आहे. इंद्रप्रस्थातील राजसूय यज्ञ, शिशुपाल वध,द्रौपदीवस्रहरण याचा वेध घेतला आहे. घोर अंगिरस गुरुंच्या आश्रमातील दिवस याचे वर्णनही दारुकाने केले आहे. द्वारकाधीश अंगिरसांच्या आश्रमात का आले हयाचे कारण सांगतांनाआचार्य म्हणतात,"तू इथे आला आहेस ते भवतीच्या सर्वांना आणि युगायुगाच्या पिढ्यांआ मनाचा विषाद काय असतो ते पटवून देण्यासाठी. रात्रीचा अनुभव घेतला तरच दिवसाचं मोल लक्षात येतं. अंधाराचा अनुभव घेतला तरचं प्रकाशाचं मूल्य कळतं."या पर्वाच्या शेवटी दारुक म्हणतो"छे !स्वामी म्हणजे नेमके कोण आहेत? काही काही केल्या कळतच नाही."!आता पुढील भागात द्रौपदी आणि अर्जून ह्या व्यक्तिरेखा आणि त्याच्या मनातील भगवान श्रीकृष्ण याचा आढावा घेऊ या.

द्रौपदीआपल्या जन्माशी निगडीत असलेल्या घटनांचे वर्णन करुन द्रौपदी स्वयंवराची कथा सांगायला सुरुवात करते. त्या निमित्त्याने तिची आणि कृष्णाची पहिली भेट झालेली आहे. स्वयंवराचा अवघड पण जर पूर्ण करता आला नाही तर काय होणार असा विचार तिच्या मनात येत असतांना आसानावरुन उठलेलेल्या द्वारकाधिषांना उद्देशुन सभेने काढलेले उद्गार ऐकताच, द्रौपदी मान वर करुन पहाते. तिच्या मनात विचार विचार चमकतो की यांनी जर पण पूर्ण केला तर यांची पत्नी म्हणून आपले जीवन कसे असेल? रुक्ख्मिणीदेवी आपला स्वीकार करतील ना? पण तेवढ्यात अर्जुनाने पण जिंकल्यावर त्याच्या गळ्यात वरमाला चढवल्यावर द्रौपदी कृष्णाकडे बघून म्हणते की द्वारकाधीषांच्या डोळ्यात क्षणापूर्वी पाहिलेल्या अभिलाषेचा लवलेशही नव्हता, होती ती स्फ़टीकासारख्या बंधुभावापेक्षाही पारखायला कठीण अशी छटा! कुंतीने 'भिक्षा वाटून घ्या' असे सांगितल्यावर सखा श्रीकृष्णाने तिची घातलेली समजुत द्रौपदीने वर्णन केली आहे.
आपले पाच पती एका पत्नीच्या आणि इंद्रप्रस्थाच्या महाराणीच्या दृष्टीकोनांतून कसे भासले, याचे विवेचन विविध घटना, उदाहरणे देऊन द्रौपदीने केले आहे. इंद्रप्रस्थाची महाराणी या नात्याने अर्थात ती महाराज युधिष्ठीरांची श्रेष्ठ पती म्हणून निवड करते तर एक स्री म्हणून भीमसेनाची! 'माते कोणतीही कुलस्त्री कधी भिक्षा होऊ शकत नाही' असे युधिष्ठीर केवळ आपल्या अभिलाषेने म्हणाला नाही आणि त्याने स्वत: द्यूत हरलयावर, आपल्या पत्नीला पणाला लावले. यामुळे दुखावलेली द्रौपदी म्हणते की" तो केवळ माझे विच्छेदनच करुन थांबला नाही तर त्याने कुठल्याही क्षत्रीयाने प्राणपणाने जपावे अशा स्वस्रीच्या लाखमोलाच्या लज्जेचे धिंडवडे काढले. दोन्ही वेळी सख्या श्रीकृष्णाने माझे रक्षण केले." आपल्या पाचही पतींचा सगळ्यात आवडलेला गुणविशेष म्हणजे त्यांची पारदर्शक मातृभक्ती असे द्रौपदी सांगते. ती म्हणते की हे पाचही बंधू म्हणजे हाताच्या पाचही बोटांनी वळलेली सशक्त मूठ होती. त्या मुठीची कळ होती ती म्हणजे त्यांची माता-राजमाता कुंतीदेवी-माझ्या सासूबाई.
द्रौपदीच्या आयुष्यात ठ्ळक अशी तीन महत्त्वाची वळणे होती. पहिले तिचे स्वयंवर की ज्यामुळे तिला पाच पती लाभले.तशीच अनुभवी राजमाताही लाभली. दुसरं वळणं होतं ते युधिशिष्ठिराचा आणि दौपदीच्या राज्याभिषेकाच. तिसर आणि महत्त्वाच वळण होत ते राज्याभिषेक आणि राजसूय यज्ञ यामधील कालखंडाच. त्या कालखंडात दौपदी पुत्रवती झाली आणि पांडवांचे इतर विवाह झाले. राजसूय यज्ञाच्या वेळी दौपदीकडून अनवधानाने एक अक्षम्य चूक झाली. ती म्हणते 'एक मनोमन झालेल्या, पुढ मलाच न पटलेल्या सुप्त विचाराची आणि दुसरी मी काढलेलया उदगारांची. अर्थातच तिचा निर्देश कर्ण सहावा पती म्हणून लाभला असता तर आणि मयसुराने तयार केलेल्या राजवाडयात पाण्यात पडलेल्या दूर्योधनाला उद्देशून काढलेल्या उदगारांकडे आहे. पुढे द्रौपदी म्हणते कि मला कर्णाबद्दल जे अनाकलनीत आकर्षण वाटल होत त्यात कोणताही शारीरिक वासनांचा भाव नव्हता. तो जन्मजात सूर्यभक्त आणि मी जन्मजात अग्निकन्या यांचा तो तेजाकर्षाणाचा भाग होता असे मला आज पूर्ण विचारांती वाटत.
द्रौपदी सांगते की आपल्या मनाच्या चक्षूंनी रोज श्रीकृष्णाचे दर्शन घेणे आणि त्याचे चिंतन करणे याशिवाय एकही दिवस गेला नाही. आकाशातल्या तारका जशा कुणाला मोजता आल्या नाहीत तसे श्रीकृष्णाची रोज दिसलेली रूपे भिन्न होती. आपल्याजवळ असलेल्या सुदर्शन यंत्राचा उपयोग नेहमी का करत नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतो " अट्टाहासाने जर का या तेजयंत्राचा उपयोग करायचा ठरवला तर जवळ येणारे हवेहवेसे वाटणारे, मानससरोवरातील शुभ्रधवल हंसपक्षासारखे, तेजयंत्राचे बोल हा हा म्हणता आठवेनासे होतात!मृगातील विजेच्या कडकडाटाने ते राजहंस कुठंच्या कुठं पांगले जावे तसे दूर उडून जातात. मग येणारा शारीरिक अनुभव पराकोटीचा थकव्याचा असतो. त्यामुळे मी क्षणैक थरथरतो. सुदर्शनाच्या प्रयोगाचा विचार गोकुळाच्या गोपींनी यमुनेत कोजागिरीचे द्रोणदिवे सोडून मोकळ व्हाव तसा दूर सोडून मोकळा होतो. खर सांगायच तर कृष्णे ,मला कुठल्याही कर्मात मनोमन कधीच अडकून पडावंसं वाटल नाही हे निदान तुला तरी समजायला हरकत नाही. "
लाभलेल्या अपार सौंदर्यामुळे आपल्या ठायी एक अहंभाव आला आहे याची जाणीव द्रौपदीला होती. ती जाणीव कृष्णानं अत्यंत कौशल्यानं माझ मन राखून तिला वेळोवेळी करून दिली होती. ते करताना तो हसत म्हणाला होता," सौंदर्यायाला विनय शोभून दिसतो कृष्णे. अप्रतिम स्त्रीच्या ठायी तो असला तर सुवर्णाला प्राजक्त फुलांचा सुगंध येतो." वनवासात भेटायला आलेल्या कृष्णाला पाहून आपल्यावर झालेल्या अन्यायाचे वर्णन सांगण्याआधी ह्याने दुष्टांचा पाडाव का केला नाही या विचाराने द्रौपदीचे मन क्रोधाने भरून येते. तेव्हा तिला शांत रहायला सांगणार्‍या कृष्णाच्या प्रेमाने क्षणात तिला आनंद होतो. "कृष्णे तू कोणत्या मनोभावात आहेस हे मी जाणतो, स्थिरचित्त हो मग मी निवांत बोलणार आहे तुझ्याशी. सावर स्वत:ला. " त्याचे हे उद्गार ऐकून द्रौपदी म्हणते की तो भाव जपणारा होता पण भाऊक नव्हता. तो सर्वांशी समरस होणारा पण कुणाच्याच मनोभावात वाहून जाणारा नव्हता. त्याचे विचार ऐकून मी स्वत:ला सावरलं.
आपल्यावर द्यूतानंतर झालेल्या अन्यायानंतरही आपले पती कसे शांत राहीले, दिग्गजांनी भरलेल्या सभेत कोणीच कशी तिची रक्षा केली नाही हे सांगताना द्रौपदीचा रोखून धरलेला संताप बाहेर येतो, भरसभेत आपली झालेली विटंबना तिने श्रीकृष्णाला सांगितल्यावर तो म्हणतो," सखे तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा तुझे पती कौरवांना पराभूत करून घेतील. यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करेन व विजय मिळवून देईन हे तुला वचन देतो. "यानंतर द्रौपदीने जयद्रथाकडून झालेले तिचे हरण व भीमार्जुनानंनी केलेली सुटका, अज्ञातवासाचे गुप्तपणे श्रीकृष्णाबरोबर केलेले आयोजन याचे सखोल वर्णन केले आहे. शिवाजी सावंतांनी अज्ञातवासाचे दिवस, विराटसेनापती कीचकाचा भीमाने केलेला वध या घटना अत्यंत प्रभावीपणे आपल्या डोळ्यासमोर द्रौपदीच्या व्यक्तिरेखेद्वारे उभ्या केल्या आहेत.
कृष्णशिष्टाई अयशस्वी झाल्यानंतर पांडवांच्या वतीने श्रीकृष्णानेच निर्णायक युध्दाचा निर्णय घेतला होता. हे युद्ध मात्र आता केवळ कौरव पांडवांच राहिले नाही. ते झाले संपूर्ण आर्यावर्ताचे. अन्यायाविरुद्धच्या न्यायाच! दमनाविरुध्दच्या दया-क्षमेचे! असत्याविरुद्ध सत्याच!पांडव युध्दाच्या तयारीला लागल्यानंतर द्रौपदी म्हणते की माझे कितीतरी दिवस नुसते विचार करण्यात व थकल्यानंतर श्रीकृष्णाचे स्मरण करण्यात निघून गेले. युध्दासाठी कोणाचा पक्ष घेणार असे विचारण्यास द्वारकेला निघालेल्या अर्जुनास द्रौपदी सांगते की काही झाले तरी श्रीकृष्णाचा पाठिंबा चुकवू नकोस,त्याला पांडवांपासून दूर जाऊ देऊ नकोस. इतर सर्व जग आणि त्याचा पाठिंबा चुकवलास तरी चालेल. यानंतर द्रौपदीने युद्धाची तयारी, सैन्याची मांडणी, डावपेच इत्यादींचे ओघवते वर्णन केले आहे. युद्ध सुरु होताना व झाल्यावर एक महाराणी म्हणून व पांडवांची पत्नी म्हणून होणारी तिच्या मनाची घालमेल, उत्सुकता, अधिरता वाचकाला खिळवून ठेवते. परंतु एक क्षत्राणी म्हणून ती म्हणते की आमच्या रक्तातच भिनल असत की जीवन हाच एक संग्राम आहे. अभिमन्यूच्या वधानंतर शोकाकूल द्रौपदीला कृष्ण म्हणतो"याज्ञसेने युध्द म्हणजे महायज्ञ!त्यात कुणाकुणाला आणि कसली कसली कसली समिधा अर्पण करावी लागेल सांगता येत नाही."यापुढील भागात आपण अर्जुनाच्या व्यक्तिरेखेचा आढावा घेऊ.


युगंधर रसास्वाद भाग ४
अर्जुनाची व्यक्तिरेखा आपल्या समोर रेखाटताना शिवाजी सावंतांनी कृष्णाच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्या समोर उलघडले आहेत. श्रीकृष्णाचे जीवन समजणे किती अवघड आहे व त्याचा आवाका किती मोठा आहे ते स्पष्ट करताना अर्जुन म्हणतो,"श्रीकृष्णावर विचार करू लागलो की घटनांचे मृगतांडे मनात धपाधप उड्या घेत अनावर गतीने धावू लागतात. अनेकविध आकारांच्या रंगवैभवी मयूरपक्षांचे थवेच थवे मनाच्या किनाऱ्यावर केकारव करीत अलगद उतरू लागतात. त्यातील कुठल्याही एकावर म्हणून दृष्टी जखडून ठेवता येत नाही. मला आठवेल तशी ही कृष्णार्जुनगाथा मी सांगतो आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की त्याच जीवन म्हणजे मला गांडीव धनुष्याबरोबर मिळालेल्या अक्षय्य भात्यासारखे आहे."
अर्जुनाला त्याच्या नावाचा अर्थ समजावून सांगतला तो कृष्णाने. अर्जन म्हणजे मिळवणे , प्राप्त करणे. जगातील कीर्तीला नेणार निवडक ज्ञान म्हणून जे जे काही आहे त्याच अर्जन करणे हेच तुझ जीवनसाफल्य आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो.
अर्जुनाशिवाय मोजक्यांनाच श्रीकृष्ण सखा म्हणायचा. त्यात त्याचा सारथी दारूक होता. परममित्र सुदामा होता. हस्तिनापूरचे महात्मा विदूर आणि मंत्री संजय होते. आणि उद्धवदादा होते. आपण श्रीकृष्णसखा आहोत ही कल्पनाच अर्जुनाला आनंददायी होती आणि म्हणून आपल्याला कृष्णाने सखा म्हणावे असे अर्जुनाला वाटे. पण प्रसंगानुरुप श्रीकृष्ण त्याचा उल्लेख वेगवेगळ्या नावाने करीत असे हे सुद्धा अर्जुनाला समजले होते.
युगंधरमध्ये या भागात आपल्या भावंडांचे, मातेचे आणि द्रौपदीचे वर्णन अर्जुनाने केलं आहे. जगाच्या दृष्टीने पाच वेगळे बंधू वाटले तरी पाचजणांच एका बळकट मुठीसारखं अभेद्य अस्तित्त्व होतं. त्यात एकीत मोठा वाटा होता कुंतीमातेचा आणि द्रौपदीचा. पण कोणत्याही तराजूत घालून न जोखता येण्याजोगा वाटा होता तो परमसखा श्रीकृष्णाचा. त्याच्याच मार्गदर्शनाने पांडव लाक्षागृहापासून तर अज्ञातावासापर्यंत सगळ्या अवघड प्रसंगातून बाहेर पडले होते.
श्रीकृष्णाने पुनर्वसित केलेल्या हजारो कामरूप स्त्रियांचा विचार अर्जुनाच्या मनात येतो तेव्हा तो म्हणतो,' की स्त्रीत्वाचा जो अर्थ कृष्णाला कळला होता तो एकाही वीराला कळला नव्हता.'
द्रौपदीचे विभाजन, पाच पतींबरोबर तिच्या एकांताची संहिता कुंतीने श्रीकृष्णाच्या मदतीने आखली होती. आपल्या पुत्रांचे नामकरण व पालनपोषण या सर्वाकरता, आपल्याला सखा श्रीकृष्ण सदैव आपल्याला मागर्दर्शन करीत होता याची जाणीव अर्जुनाला सतत होती.
जीवनाचे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी आपले जेष्ठ बंधू युधिष्ठिर व भीमाची निवड न करता आपलीच निवड श्रीकृष्णाने का केली असावी याची कारणेही अर्जुनाने दिली आहेत.
अर्जुनाच्या आयुष्यातील अथवा अर्जुन साक्षीदार असणाऱ्या कित्येक घटना आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याचे सामर्थ्य युगंधरमध्ये आहे. नागकन्या उलुपीशी विवाह, पाशुपतास्त्राची प्राप्ती व त्यानंतर अर्जुनाची बदललेली मनोवृत्ती याची वर्णने उदाहरण म्हणून देता येतील. त्याशिवाय चित्रागंदेकडून नृत्याचे शिक्षण, सुभद्राहरण, अश्वत्थ्याम्याने केलेली दिव्य सुदर्शनचक्राची मागणी, द्रोणाचार्यांनी एकलव्याला मागितलेली गुरुदक्षिणा अशीही अनेक उदाहरणे देता येतील.
अर्जुनाने आपल्या भावंडांबरोबर धृतराष्ट्र, भीष्म, दूर्योधन,द्रोणाचार्य, शकुनी यांचे स्वभाव विश्लेषणही केले आहे. यादवांच्या इतर स्त्रिया आणि कौरव पांडवांच्या स्त्रिया यांची तुलनाही त्याने द्रौपदी, राधा आणि रुक्मिणीशी केली आहे. ही सर्व वर्णने मनोवेधक आहेत. श्रीकृष्णसखी व आपली पत्नी दौपदी, हिच्याबद्दल अर्जुनाला वाटणारा आदर व अर्जुनाचे आपल्या मातेवरील निस्सीम प्रेमही आपल्याला कित्येक ठिकाणी दिसते.
कुरुक्षेत्रावरील सैन्याची मांडणी व त्याचे वर्णन वाचनीय आहे. 'आपल्याच नातेवाईकांना, जेष्ठांना, गुरुजनांना युद्धात मारायचे' या विचाराने हतबल झालेला अर्जुन आपल्या डोळ्यासमोर वर्णनाद्वारे उभा राहतो. त्यावेळी त्याला श्रीकृष्णाने गीतेसारख्या अमर जीवनतत्त्वाची जाणीव करुन दिली. त्याचे वर्णन वाचताना शिवाजी सावंतांच्या लेखणीचे सामर्थ्य कळते. यासर्वाचा आढावा घेणे माझ्या आवाक्याबाहेर आहे.
अभिमन्यूच्या वधाने संतप्त अर्जुनाने, 'दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचा वध करेन अन्यथा अग्निप्रवेश करेन' अशी प्रतिज्ञा केली. जयद्रथाला ठार करता न आल्याने अर्जुनाने अग्निप्रवेशाची तयारी केली. 'त्यावेळी चितेवर चढताना गांडीव धनुष्य बरोबर ठेव' असा सल्ला श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला. 'माझ्या तर्जनीकडे लक्ष ठेव' असाही धनुष्यधारी अर्जुनाला महत्त्वाचा संदेश श्रीकृष्णाने दिला. त्यावेळी सूर्यग्रहणाचे वेध सुटताच रणभुमीवर सूर्यदेव अवतरले याचे वर्णन शिवाजी सावंतांनी अलंकारीक भाषेत केले आहे.
जयद्रथाच्या वधानंतर युद्धाचा चौदावा दिवस संपतो. "आपण एक सामान्य नर आहोत आणि श्रीकृष्ण म्हणजे नारायण आहे" या अर्जुनाच्या वाक्याने युगंधरच्या 'अर्जुन' ह्या भागाचा शेवट होतो.

प्रस्तावना

प्रस्तावना
भारताबाहेर व भारतातही मोठ्या शहरात राहणारी, इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले, आज रामायण, महाभारत, चिंगी चिंटू किंवा फास्टर फेणेपेक्षा विनी द पू, बारनी, सुपरमॅन आणि हॅरी पॉटरचे चाहते आहेत. त्यात गैर आहे असे म्हणता येणार नाही कारण सभोवतालच्या वातावरणाचा तो परिणाम आहे. त्यांना रामायण महाभारत वा पंचतंत्र आपले वाटते पण तेही इंग्रजीतून वाचले की. आता भारतात काही चांगले ऍनिमेशनपट येत आहेत आणि त्याद्वारे मुलांना कित्येक पौराणिक व्यक्तिरेखा कळत आहेत. पण आपले सणवार, चालीरिती ह्या लहान मुलांना सांगायच्या कशा असा प्रश्न माझ्यासमोर नेहमी असतो. भारताबाहेर तरी सर्व प्रसारमाध्यमे, खेळणी, पुस्तके ह्यातून भडीमार होतो तो नाताळ,फॉल फेस्टिवल, ईस्टर व इतर परंपरांचा. दसरा दिवाळी साजरे होतात ते सप्ताहांताला किंवा सोम-शुक्रवारी गडबडीने. गावात भारतीयांची संख्या कमी असेल तर काही बोटावर मोजण्याएवढी मंडळीच त्यात सहभागी होतात आणि मग वेगळा पोशाख, वेगळे अन्नपदार्थ ह्यांचे समर्थन आपल्या मित्रात करता न आल्याने मुलांच्या मनात एक अढी निर्माण होते.
शेवटी मनात येते महत्त्वाचे काय? मुलांना ह्या परंपरांचे मह्त्त्व कळणे. आज परदेशात किंवा इतर धर्मीय मुलांमध्ये वावरताना त्यांना कमीपणा न वाटता अभिमानाने आपल्या चालीरितींबद्दल बोलता येणे व त्यांचे मनापासुन पालन करावेसे वाटणे हेच.
मग माध्यम आणि भाषा यासाठी कदाचित थोडी तडतोड सुरुवातीला करावी लागली तरी चालेल.
अशा मुलांना आपले सणवार थोडक्यात त्यांच्याच सवंगड्यांद्वारे समजवून सांगण्याचा हा एक प्रयत्न.
एखादा

Monday, January 15, 2007

माझे अमेरीकेतील शेजारी

माझे अमेरीकेतील शेजारी

'कसे आहात? सगळी खुशाली आहे ना? "असे म्हणून मुलाशी बास्केटबॉल खेळत असतांना विल्यम आमच्याशी हस्तांदोलन करतो. उंचपुरा, धिप्पाड, हसतमुख विल्यम, त्याची हसरी आणि कधीही पाहिले तरी टवटवीत दिसणारी पत्नी स्टेसी व त्यांची बागडणारी ३ मुले , हे आहेत आमचे जवळचे शेजारी. जाता येता बोलणे व हवापाण्याच्या चर्चेव्यतिरिक्त आम्ही आजवर कोणत्याही अमेरीकन कुटुंबाच्या जास्त जवळ गेलो नव्हतो. त्यामुळे नवीन गावात, भारतीय नसणार्‍या वसाहतीत आपला कसा निभाव लागणार याची काळजी वाटत होती. पण आमच्या हया शेजार्‍यांमुळे आम्हाला जरा धीर आला. थोड्याच दिवसात निरीक्षणाने मला कळलेसकाळी ६-६.३० च्या सुमारास विल्यम कामाला जातो. त्याला निरोप दिला की स्टेसीचा विविध कार्यक्रमांनी भरलेला दिवस सुरु होतो. थोड्याच दिवसात निरीक्षणाने मला कळले की लिसा(१३वर्षे), थॉमस (११वर्षे) व ३ वर्षाच्या लहानग्या मॅगीला पटापट तयार करून, ती न्याहारी झाल्यावर त्यांना घेवून स्टेसी आपल्या मोठ्या गाडीतून शालेत सोडते. त्यानंतर कधी सायकल चालवणे, टेनिस खेळणे तर कधी शाळेत नृत्य शिकवणे याकरता तिचा वेळ आखलेला असतो. मुलीशी खेळत मी जर बाहेर अंगणात असेन तर जाता येता स्टेसी माझ्याकडे पाहून हसते आणि तिचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे सांगत गाडीतून दिसेनाशी होते. घरकाम, थोडे बागकाम झाले की दुपारी १२.३० च्या सुमारास ती छोट्या मुलीला शाळेतून घरी आणते आणि बाहेरून येता येता पाकीट्बंद जेवण उचलून घेवून येते. मनात विचार यायचा काय कमी आहे त्याच्या आयुष्यात? सगळे कसे सुंदर, निटनेटके आणि हेवा वाटावे असे. एका संध्याकाळी दारावरची घंटा वाजल्याने या वेळी कोण आले? आणि तेही काही कल्पना न देता? या विचाराने साशंक मनाने मी दरवाजा उघडला. दारात शेजारच्या स्टेसीला पाहून तर मी चकीतच झाले. जरा संकोचून तिने "मला थोडे लसूण हवे आहे", हे सांगितल्यावर माझा माझ्या कांनांवर विश्वासच बसला नाही. शेजार्‍याने न विचारता येणेअशी जवळीक भारतातच मोठया शहरात पहायला मिळत नाही मग अमेरीकेचे तर दूरच राहीले. त्यांचे सारे आयुष्यच शिष्टाचार पाळण्यात जाते. असो. मग हळूहळू मुलींच्या खेळण्याच्या निमित्त्याने आम्ही दोही एकमेकींना विचारून घरी भेटू लागलो. माझ्या चटकन लक्षात आले की स्टेसीचे घर निटनेटके आणि सजवलेले असते. दिवाणखाण्यात मोठाली लक्ष वेधणारी चित्रे आहेत, जगभरातून गोळा केलेलया शोभिवंत वस्तुंने भरलेली कपाटे आहेत. स्टेसी घराविषयी सजावटीचे व बागकामाचे सर्व निर्णय घेते व नवर्‍याच्या मदतीने ते प्रत्यक्षात आणते. त्यातूनच त्यांचे वाद होतात हे सांगणे नलगे. तिला खरच दिवसभर घर आवरत खपाव लागत. एक एखादे वेळी जर जरा पसारा असेल तर स्टेसी योग्य कारण देवून लगेच आवरायला उशीर कसा झाला ते मला सांगते. अमेरीकन मुले त्याच्या स्वत:च्या खोलीत झोपतात आणि लगानपणी तरी खूप वळणात असतात. व्यक्तीस्वातंत्र्याचे वारे आणि मित्रमंडळाचा सहवास यावर मग सारे काही बदलायला लागते. आता स्टेसीच्या लहान मुलांचेच पहा ना. स्टेसीची मुलगी लिसा ही आपल्या दोन्ही भावंडांना नीट सांभाळते, आई करत असलेले कष्ट जाणून घेते आणि त्याबद्दल आदर दाखवते. लिसा सुंदर चित्रे काढते,घरांच्या विविध प्रतिकृती करते. तिला अभ्यासात लागणारी मदत स्टेसीच करते. मुलगा थॉमस हा आपला वेळ अभ्यासाव्यतिरिक्त बास्केट्बॉल, फ़ूट्बॉल खेळण्यात आणि इतर अमेरीकेन मुलांप्रमाणे"व्हिडीओ गेम" ख़ेळण्यात घालवतो. दोन्ही मुली बाहुल्या आणि त्यांचे सगळे खेळ खेळतात. स्टेसी घरकाम करत असतांना कधीकधी विल्यम मुलांबरोबर खेळतो. जमेल तेव्हा भांडी विसळून भांडी घुण्याच्या यंत्रात टाकणे हे त्याचे नित्याच काम असते. अमेरीकेत आलयावर स्वावलंबनाचे आणि कष्टांचे अधिक महत्त्व कळते. भारतीय लोक भारतीय आणि अमेरीकन अशा दोन्ही समाजात वावरत असतात त्यामुळे त्यांची धावपळ पाहाण्यासारखी असते. स्टेसीकडून कळले की त्याना दुसर्‍या राज्यात असतांना भारतीय मित्र होते. त्यामुळे भारतीय चालीरिती,पदार्थ याची बरीच माहिती आहे. भारतीय शेजारी आहेत याचा तिला आनंद झाला होता. थॉमसला बटाट्याचे पराठे आवडतात हे ही तिने मला सांगितले. आणि शक्य झाले तेव्हा माझ्याकडून कृती लिहून करूनही पाहिले. माझ्या मुलीला आंग्ल भाषेचे एवढेसेही ज्ञान नसल्याने तिची कळकळीची मराठीतील बडबड, स्टेसीला व तिच्या छोट्या मुलीला मॅगीला अनुवाद करून सांगण्यात माझा बराच वेळ जायचा. जास्त ओळख झाल्यावर भाषा समजत नसतांही खाणाखुणा आणि अनुकरणाने दोघी खेळायला लागल्या. स्टेसीच्या बोलण्यातून कळले की विल्यम व स्टेसीचे कुटुंबीय अमेरीकेतल्या दक्षिण भागात वाढलेल्या काही मूळच्या फ़्रेंच रहिवास्यांपैकी आहेत. जुने रितीरिवाज पाळणार्‍या कुटंबांमध्ये त्याचे नाव असावे असे मला वाटते. त्याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक सणसमारंभ करतांनाच्या पद्धतीतून आणि दैनंदिन राहणीमानातून मला येत गेला. त्यांचे दोन्हीकडील जवळचे नातलग गावात आणि नजीकच्या छोट्या खेडयात आहेत. त्यामुळे मुलांना दोन्हीकडील आजीआजोबा भेटायला येतात वा सुटीच्या दिवशी घरी घेवून जातात. येथील आजीबाईंकडे पण बटव्यात औषधे आणि युक्त्या असतात बर का! हे मला स्टेसी कडूनच कळले. समारंभाला जायचे म्ह्टले की मुलांना आजीआजोबांकडे ठेवून विल्यम व स्टेसी झकपक कपडे घालून जातात. त्याकरता ३-४ दिवस आधीपासुन स्टेसीची तयारी व रंगीत तालीम सुरु असते. " दिसत तस नसत" म्हणतात ना. वरवर हसतमुख आणि टवटवीत स्टेसी किती काळजी करते हे तिच्या बोलण्यातून कळले. स्टेसी दोन मुलांच्या जन्मानंतर नोकरी सोडून घरी राहिली होती. नृत्य शिकवणे आणि मसाज थेयरपी ह्यातून ती आपला वरखर्च चालवत होती. तिच्या बोलण्यातून आई आणि आपले विश्व असणारी स्वावलंबी स्री ह्यातले द्वंव दिसत होते. मुले मोठी झाली की आपणही पुन्हा पूर्णवेळ नोकरी करु अशी तिला आशा वाटत होती. तिचा अहम जोपासणारा तिला काही उद्योग करता येईल का? असे तिच्या मनात सतत विचार असायचे. "अग मग तू कविता कर, लेख लिही, लहान मुलांसाठी लिही"असे सांगोतल्यावर उजळ्लेला स्टेसीचा चेहरा अजुनही माझ्या डोळ्यासमोर आहे. इतर काही ओळखीच्या कुटुंबातील अमेरीकन नवर्‍यांप्रमाणे काही कारणाने विल्यम आपल्याला घटस्फ़ोट तर देणार नाही ना?ही भिती तिला मनातल्या मनात कुरतडत होती. अशा वेळी विल्यम हुशार आहे, त्याला माझ्यासारखी प्रेमळ बायको आणि मुलांची आई मिळणार नाही म्हणून तो असे वागणार नाही. असा दिलासा ती स्वत:ला देत असते. अगदी भारतातल्या पारंपारीक सुनेप्रमाणे आपली सासू काय म्हणेल याची काळजी दिसते. स्टेसी माझ्याकडून घरी करायच्या चपात्या शिकल्यावर तिच्या सासूला झालेला आनंद आणि तिने केलेले कौतुक ऐकून मला गंमत वाटली होती. हळूहळू आमचे जाणे येणे वाढले आणि मग मला वसाहतीतील कोण काय काय करतो, कोणाचे घर कसे असते, मुले काय करतात याची माहीती मिळू लागली अर्थातच माझ्या खास जासूसाकडून! मला जाणवले की राजकारण, धर्म ,सिनेमा, खेळ या सर्व विषयांवर अमेरीकन माणसे मनमोकळेपणाने बोलतात. एवढेच काय जास्त ओळख झाली की अगदी खास बायकांच्या ज्या गप्पा असतील त्या सुध्दा रंगायला वेळ लागत नाही! तेव्हा मात्र पारंपारीक चाळीत जे काय पहावे, ऐकावे, त्याची जरा सुधारीत आवृत्ती अमेरीकेत आहे याची माझी खात्री पटली. नको तेवढा स्पष्टवक्तेपणा,मुलाचा अभ्यास, तब्येतीच्या तक्रारी, नवरा बायकोचे घरर्खचावरून भांडण या गोष्टी अमेरीकनांमध्ये असतात म्ह्टलयावर "घरोघरी मातीच्याच चुली" या म्हणीची सार्थता कळली. पण फ़क्त पराकोटीचे व्यक्तीस्वातंत्र्य आणि स्वछंदी जीवनाचा परिणाम स्टेसी सारख्या लोकांना आता उशीरा का होईना घाबरवतो आहे कारण त्याचा शेवट असतो तो मोडकळीला आलेली कुटुंबसंस्थतेत. स्टेसीला कुटुंबाकरता तडजोड करणार्‍या कितीतरी स्त्रीया माहीती आहेत. काही पुरुषांनाही निदान लग्न केल्यावर तरी येणार्‍या जबाबदारीची आणि मायेच्या धाग्यांची जाणीव होते आहे. मी अमेरीकेच्या वेगवगळ्या भागात राहीले आहे. आमच्या भारतीय मित्रमंडळींकडूनही त्यांच्या विविध भागातल्या अमेरीकन शेजार्‍यांच्या कथा ऐकल्या आहेत. तेव्हा आपले घर आणि त्यासाठी झटण्याची आणि तडजोडीची मनोवृत्ती साधारण दक्षिण भागात आणि छोट्या गावात अधिक दिसून येते असे मला वाटते. माझ्या शाळेतही ( graduate school) अशा विचारांचे अमेरीकन स्रीपुरुष होते त्यांचेही उदाहरण देता येईल. कदाचित ह्या अशा अमेरीकनांची संख्या पूर्ण अमेरीकेच्या दहा टक्केच असेल पण तेही नसे थोडके. ही कुटुंबासाठी जगण्याची वृत्ती मध्यमवर्गीय सुशिक्षीत अमेरीकन समाजात वाढली लागते आहे. ही गोष्ट्च मुळी किती धीर देणारी आणि अंधानुकरण करणार्‍या काही भारतीयांना योग्य दिशा दाखवणारी आहे. इथे जे वाईट आहे ते सातासुमुद्रापार आपल्याकडे पोहोचले आहेच. पण आपल्याकड असलेले चांगले इथे रुजू पहाते आहे हे किती आशादायी चित्र आहे. कदाचित वारे उलटे वाहयला लागले नाहीत ना?
-सोनाली जोशी

ग्रॅन्ड कॅनियन

ग्रॅन्ड कॅनियन
ग्रॅन्ड कॅनियन सहलीच्या दरम्यान काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. ह्या लेखमालेत त्या ठिकाणांची माहिती देते आहे. अमेरिकेतील लोकांचे अनुभव, प्रवासाची पूर्वतयारी, विमान प्रवासात येणारे अडथळे याचे वर्णन आणि अनुभव वाचकांपुढे मांडण्याची इच्छा आहे. माहितीजाल वापरून आरक्षणे करताना घेण्याची काळजी, अमेरिकेतील प्रादेशिक वैशिष्ट्ये याची वाचकाला माहिती व्हावी अशी सुद्धा माझी भूमिका आहे. छायाचित्रे लेखमालेच्या शेवटी देणार आहे. शिवाय ती गुगल शोधकाचा वापर करून वाचकांना शोधता येतीलच.
आईवडीलांना या फेरीत जमेल तेवढे अमेरिका दर्शन घडवण्याचा विडा मी उचलला होता. मानवनिर्मित स्थळांपेक्षा आम्हाला निसर्गाची विविधता आवडेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अमेरिकेतील राष्ट्रीय उद्यान दर्शन हा चटकन समोर येणारा एक पर्याय होता.(नॅशनल स्टेट पार्क्स) आईवडीलांनी ग्रॅन्ड कॅनियन, मोन्युमेंट व्हॅली, ब्राईस कॅनियन व झायन कॅनियनला बघायला आवडेल असे सांगितले.
आमच्या सहलीतील प्रवासाचे टप्पे साधारण असे होते-आमच्या गावापासून न्यू ऑर्लीन्स,(ल्युझियाना राज्य) असा एक तासाचा कारचा प्रवास करून विमानतळावर जायचे. त्यानंतर न्यू ऑर्लिन्स ते लासवेगास(नेवाडा राज्य) असा साधारण साडेचार तासाचा विनाथांबा (डायरेक्ट फ्लाईट) विमानप्रवास करायचा. माझा भाऊ टेक्सास राज्यातून लास वेगासच्या विमानतळावर आम्हाला भेटणार होता. त्या रात्री लास वेगास दर्शन व तेथेच रात्रीचा मुक्काम. दुसऱ्या दिवशी चौघांनी पुढे साधारण सहा तासाचा कारने प्रवास करून वाटेतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत ग्रॅन्ड कॅनियनचा पल्ला गाठायचा.
विमानाची तिकिटे,वेगवेगळ्या गावातील राहण्याच्या जागेचे आरक्षण, कार याची व्यवस्था झाली. त्यानंतर सगळ्या सहलीचे अंदाजे वेळापत्रक, विविध राज्यांतून वाहतुकीचे मार्ग दाखवणारे व माहितीचे नकाशे, छायाचित्रक (कॅमेरा),चलचित्रक(व्हिडिओ कॅमेरा)गाण्याच्या ध्वनिफिती, आपापल्या बॅगा यांची जमवाजमव झाली. मेमोरियल डे हा मे महिन्यातील मोठा सप्ताहांत (लॉन्ग विकेंड)जसा जसा जवळ येऊ लागला तशी आमची पहिली वाहिली, एकत्र, कौटुंबिक सहल अगदी नजरेच्या टप्प्यात दिसू लागली.
गावातील काही मित्रांनी,"वा तुमची काय मजा आहे .चौघेजण मस्त फिरा, बिचारा नवरा घेतो आहे मुलीची आणि घराची काळजी! अशी गंमत केली.
एकाने "आता अगदी मुहूर्त पाहून काय जाता आहात? वाळवंटात रखरखणारे ऊन आणि मोठ्या सुटीची केवढी गर्दी !आम्ही सुद्धा हीच सहल केली आहे पण कसे अगदी सगळे नीट आखून , काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन!"असा प्रेमळ सल्ला दिला.अशा सल्ल्यांनी मिनिटा मिनिटाला माझे डोके वाळवंटापेक्षा अधिक तापत होते.
"तुम्हाला तिकिटे कशी मिळाली? ""केवढ्याला मिळाली? हॉटेल कोणती आहेत?त्यांचे दर काय?""बाप रे एवढे महाग" "वा!मजा आहे, छान चापलेत!" अशा संवादांनी आमच्या हितचिंतकांनी माझ्याशिवाय आईवडीलांना दूरध्वनी करून भंडावून सोडले ते वेगळेच.
मग आईबाबांना दरवेळी डॉलरचे रुपयांत हिशोब करतांना पाहून प्रवासाची मजा कमी होईल की काय अशी मला काळजी वाटू लागली. आमच्या जमा झालेल्या 'विमान मैलांतून' (फ्रिक्वेंट फ्लायर माईल्स) तुमची तिकिटे काढली आहेत आणि हॉटेलचा खर्च फार नाही असे त्यांना सांगितले.
कार्यालयातील अमेरिकन सहकाऱ्यांनी सुद्धा ही काळजी घ्या, अमुक करा, तमुक करू नका अशा सूचना दिल्या. कमी अधिक प्रमाणात तिकिटे आणि इतर गोष्टींविषयी उत्सुकता त्यांनी सुद्धा दाखवली. आपल्या माणसांनी, आपल्या भाषेत केलेल्या चौकश्या कदाचित जास्त बोचऱ्या वाटतात. गोऱ्या साहेबाने काही विचारले तरी त्याचा साधा सरळ आणि योग्यच अर्थ घेण्याची गुलामगिरी अजूनही माझ्यातून गेली नाही अशी खंत त्यावेळी मला वाटली.
सर्व आवश्यक गोष्टी घेतल्याची उजळणी करत आमची गाडी न्यू ऑर्लिन्स कडे धावू लागली. भटक्याने(भ्रमणध्वनीने, मोबाईल फोन) भावाशी संपर्क साधला. पुढील एक तासात तो सुद्धा त्याच्या गावातील विमानतळाकडे निघणार होता.
न्यूऑर्लिन्स विमानतळाशेजारील पार्किंग व्यवस्थेत गाडी पार्क केली. तेथून सगळे सामान घेऊन आम्ही एका बसने "चेक इन" करायच्या रांगेत उभे राहिलो.

विमानाची सुटण्याची वेळ एकदा पुन्हा भटक्याने(भ्रमणध्वनी, मोबाईल फोन) संपर्क करून तपासली. आतापर्यंत विमान वेळेवर आहे असे दाखवणारे फलक आता विमान दोन तास उशीरा सुटणार असे दाखवत होते. लगेच घरी पतीला व भावाला दूरध्वनीने त्याची कल्पना दिली. थोडक्यात आमच्या आधी पोचल्यामुळे भावाला लासवेगासला आमची प्रतीक्षा करावी लागणार असे दिसत होते.
विमानप्रवासाच्या वेळापत्रकात असे थोडे फार बदल होऊ शकतात याची आम्हाला कल्पना होती. आई बाबा गप्पा मारत होते. मी अधून मधून बॅगांशेजारी रांगेत उभी राहत होते. जसजशी गर्दी वाढत होती तेंव्हा लोकांशी बोलताना नवीन माहिती मिळाली. याच कंपनीचे काल सुटणारे हेच विमान रद्द झाले होते आणि त्यातील विमानप्रवासी आज आमच्या बरोबर येणार होते. शेवटी एकदाच्या आमच्या बॅगा 'चेक इन' होऊन हातात 'बोर्डिंग पास' मिळाले. आमच्या गप्पा सुरू होत्या. विमानतळावर जवळपास चार तास ताटकळत थांबलो होतो. अखेर ज्याची भिती वाटत होती तेच घडले. रात्री साडेअकराच्या सुमारास अखेर आज सुटणारे आमचे विमान रद्द केल्याची घोषणा कानी आली! विमान कंपनीशी संपर्क करून पुढील प्रवासाचे पुर्नआरक्षण करण्याची व सामान परत घेण्याची आम्हाला सूचना मिळाली. आता काय? असे मोठे प्रश्नचिह्न सगळ्याच्याच चेहऱ्यांवर दिसत होते. चिंतातुर मुद्रेने सामान परत घेण्याच्या ठिकाणाकडे जात असताना सगळ्या हातातील भटके विमान कंपनीशी संपर्क साधू लागले..
एका खेळाडूकडून दुसऱ्याकडे चेंडूफेक करावी तशी टोलवाटोलवी होत शेवटी मला मदत करण्यास समर्थ अशा कर्मचाऱ्याशी दूरध्वनीच्या रांगेत बोलण्याचा माझा क्रमांक लागला. "नमस्कार, माझे नाव मेगन आहे. मी तुम्हाला आरक्षणात मदत करणार आहे. आपण कृपया वाट पाहू शकता का?" असा प्रश्न मंजुळ आवाजात कंपनीच्या स्त्री कर्मचाऱ्याने विचारला."हे देवी माते, आता मला तारणे वा मारणे तुझ्याच हातात आहे." अशा भावनेने मी तिला 'हो' सांगितले.
सुदैवाने आमचे सगळे सामान आम्हाला मिळाले होते. आई बाबांनी अधिक विचार न करता सामानाशेजारी बैठक मारली. शारीरिक श्रमापेक्षा पुढे काय होईल या अनिश्चिततेमुळे त्यांना,मला आणि इतर सहप्रवाश्यांना थकवा आला होता. नवराबायकोची भांडणे, लहान मुलांचे रडणे, किरकिर आणि दूरध्वनीवरील तावातावाची संभाषणे ऐकू येत होती. वेंडिंग मशीन मधील शीतपेयांच्या कॅन्सचा घरंगळताना येणारा आवाज, बाहेर सिगारेटचा वाढता धूर सारे काही लोकांच्या सुटीच्या आनंदावर विरजण पडते की काय या भावनेच्या उद्रेकाची लक्षणे होती.
माझी सगळी माहिती ऐकून मेगनने तिच्या संगणकाच्या यंत्रणेत आमची तिकिटे शोधली. तिला सकाळी ६ वाजता न्यू ऑर्लिन्स ते फिनिक्स आणि पुढे विमान बदलून लास वेगासला जाणाऱ्या एका विमानात दोन जागा शिल्लक आहेत असे दिसले. आई बाबांचे आरक्षण वेगळ्या कोट्यातून केले होते. त्यामुळे त्यांना या जागा मिळू शकत नाहीत असे तिने सांगितले. मी एकटीने पुढे जाण्यात काहीच अर्थ नव्हता." आमच्या कोणत्याही विमानात तुम्हाला देता येतील अशा जागा उद्या संध्याकाळपर्यंत उपलब्ध नाहीत.""दुसऱ्या विमानकंपनीला विचारता का?" "दुसऱ्या विमान कंपन्यांच्या जागेसाठी तिच्या वरिष्ठांकडे विचारावे लागेल "
आमचे संभाषण नक्की काय सुरू आहे याचा अंदाज आई बाबांना होता. तिला मी सर्व पर्याय विचारले अथवा नाही याची ते खात्री करत होते. मी सार्वजनिक दूरध्वनीने घरी दूरध्वनी केला. भ्रमणध्वनीवर ती कर्मचारी आणि दुसऱ्या दूरध्वनीवर पती, असे दोन कानांना दोन दूरध्वनी लावून माझी कसरत सुरू होती.
आम्ही दुपारी चार पर्यंत जर लासवेगासला गेलो तर हॉटेल व गाडीच्या आरक्षणात किरकोळ बदल करून बाकी इतर बेत तसाच राहणार होता. विमानतळावरची गर्दी आता पांगू लागली. सर्व विमान प्रवाश्यांची व्यवस्था एका हॉटेलात केली होती. तिथे जाण्यास आता मंडळी लगबगीने निघू लागली. विमानतळावर बहुतेक सर्वांना उद्या सकाळ ते दुपारपर्यंत निघणाऱ्या विमानांवर जागा मिळाली होती असे त्यांचे चमकणारे चेहरे सांगत होते.
"आमच्या कुटुंबातील काही सदस्य आधीच लासवेगासला पोचले आहेत. आम्ही उद्या दुपारपर्यंत गेलो नाही तर इतर सर्व बेत रद्द करावे लागतील"
"ओह, तुम्हाला लग्नाला जायचे आहे"
माझे तर्खडकरी अथवा शुद्ध आमटीभात इंग्रजी ऐकून आम्ही सर्व एका लग्नाला जात आहोत असा तिचा गोड गैरसमज झाला.
जवळपास अर्ध्या तासाने आम्हा तिघांची व्यवस्था तिने दुसऱ्या एका विमानकंपनीच्या, तीन टप्प्याने लासवेगासला जाणाऱ्या विमानांवर केली.
'माझ्याजवळ हाच एक पर्याय आहे तेंव्हा तुमचा निर्णय सांगा' .मी तिला होकार दिला. दुसरीकडून दूरध्वनीवर पतीने मी तसेच करावे असे सुचवले. "उद्या सकाळी दोन तास आधी विमानतळावर या व तुमचे बोर्डिंग पास घ्या".
तिने दिलेली आरक्षणाची सर्व माहिती नीट लिहून घेऊन तिचे आभार मानून मी संभाषण संपविले.
माझा भाऊ एका तासातच लासवेगासला येऊन पोहोचणार होता. विमानात भ्रमणध्वनी बंद असल्याने त्याला ह्या घडामोडींची काहीच कल्पना नव्हती. माझे सर्व निरोप त्याला विमानातून बाहेर आला की मिळणार होते.
एका बसने विमानतळावरून आम्ही हॉटेलवर गेलो. आई बाबांची झोपमोड होऊ नये म्हणून मी दुसऱ्या खोलीतील दूरध्वनीवरून हॉटेल व कारचे आरक्षण बदलू लागले. सगळीकडे भ्रमणध्वनी कक्षेत असतो या फाजील आत्मविश्वासाने मी कोणतेही 'कॉलिंग कार्ड' घेतले नव्हते. नेमका हॉटेलमध्ये माझ्या भ्रमणध्वनीचा संपर्क जाळ्यापासून तुटला होता!
भावाशी संपर्क करता यावा म्हणून मी मध्यरात्री हॉटेल बाहेरील हिरवळीवर बसून इतर आरक्षणे बदलू लागले. डास, मुंग्या रातकिडे यांच्या सोबतीने एकटेपणा वाटत नव्हता......

माहितीजाळ्यावरून हॉटेल, कार व विमानाच्या तिकिटांचे विविध कंपन्यांतर्फे आरक्षण ही सध्या अगदी प्रचलित बाब आहे. प्रत्येक वेळी आपण काही नियम/ अटी स्वीकारून मग पुढे आरक्षण करत असतो. प्रत्येक ठिकाणी मुख्य प्रवासी म्हणून माझे नाव व इतर माहिती दिली होती. बरीच हुज्जत घातली आणि माझ्या ध्यानात आले की माझ्या भावाकरता कार किंवा हॉटेल कशाचेही आरक्षण हस्तांतरित होणार नव्हते आणि हॉटेलचे पैसे परत मिळणार नव्हते. कारण ती अट मीच मान्य केली होती!! भाऊ टॅक्सी करून हॉटेलवर गेला असता पण आता हॉटेलचे नवे आरक्षण आवश्यक होते. तेवढ्यात भावाचा दूरध्वनी आला. त्याला सर्व माहिती दिली. हॉटेलच्या आरक्षणाचा दर कळताच त्याने लासवेगास विमानतळावर उरलेली रात्र व आम्ही येईपर्यंतचा दिवस सहज घालवता येईल असे उत्तर दिले. लासवेगास हा अतिशय गजबजलेला विमानतळ असल्याने तसा तिथे राहण्यात धोका नव्हता.
जेमतेम एक दीड तास झोपून पहाटे चार वाजता आम्ही पुन्हा चेक इनच्या रांगेत हजर झालो. तुमचे तिकीट या कंपनीने दिले तिथे आधी जा, ही कागदपत्रे दाखवा, असे करा, तसे करा अशी तब्बल दोन अडीच तास माझी धावपळ सुरू होती. सारे सोपस्कार पार पडले. 'जा, सुखाने प्रवास करा' असा आशीर्वाद व बोर्डिंग पास हातात पडले. सकाळचे सात वाजत होते. सुरक्षाव्यवस्थेतून अगदी काटेकोर तपासणी झाली. सगळ्या तपासण्या पार पाडून आम्ही आमच्या विमान थांब्यावर गेलो. फलकावर आमचे विमान वेळेवर सुटणार असे दिसत होते. एवढा वेळ निवांतपणा असा नव्हता पण आता मात्र खूप भूक लागली आहे असे जाणवले. विमान कंपनीने सकाळच्या नाश्त्याकरता काही कूपने दिली होती. ती वापरावी असा विचार माझ्या मनात आला. ती घेणारे उपाहारगृह आमच्या नवीन विमान सुटणाऱ्या विमानथांब्यावर(टरमिनलवर) नव्हते. खिशातून एकही दमडी न देता नाश्ता करण्याचे माझे स्वप्न त्यामुळे अपूर्ण राहिले. असो. असे काही तरी मनाविरुद्ध झालेच पाहिजे!पैसे खर्चून आम्ही सर्वांनी कॉफी घेतली. खरं तर चहा कॉफीचे पैसे द्यायची आधी तयारी होती. पण त्या कुंपनांनी उगीच मनात वाद निर्माण केला. काही वेळाने विमानात प्रवेश करा अशी घोषणा झाली.
'आपले स्वागत असो 'असे मधाळ हसून हवाई सुंदरीने आमचे स्वागत केले. कमरेभोवती पट्टे आवळून आम्ही पुढील प्रवासाला तयार झालो. विमान धावपट्टीवर धावू लागले. काही क्षणातच त्याने आकाशात झेप घेतली.
या नंतर आणखी दोन ठिकाणी विमान बदलायचे होते, थोडादेखील उशीर पुढील सगळे बेत उधळून लावणार होता. आता ऐनवेळी सुटीच्या गर्दीत आरक्षण मिळणे खरंच अवघड होते. विचारातच आम्हा सर्वांचा डोळा लागला आणि विमान धावपट्टीवर उतरताना आम्हाला जाग आली. चला, एक टप्पा पार पडला. लगेच दूरध्वनीने घरी व भावाशी संपर्क साधला. त्यांना पुढचे विमान सुद्धा वेळेवर आहे याची कल्पना दिली. मनात शंकेची पाल चुकचुकत होती पण तसे काही घडण्याआतच आम्हाला पोटात सामावून दुसरे विमानही आकाशात उंचावले. सर्वजण डोळे मिटून जमेल तेवढी विश्रांती घेत होतो.
काही वेळाने लोकांनी खिडकीतून खाली दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वत शिखरांची छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. मी सुद्धा चटकन त्या शिखरांना माझ्या छायाचित्रकाने टिपले. पुढील प्रवासात मे- जून मध्ये त्या शिखरांवर खरंच बर्फ आहे किंवा नाही याकरता मी दूरवर दिसणाऱ्या सर्व पर्वतांवर बर्फ शोधत होते ही गोष्ट वेगळी!
विमान धावपट्टीवर उतरले. आता फक्त एक टप्पा की आम्ही सर्व लासवेगासला जाणार होतो.
त्या विमानतळावरून आमचे विमान सुटण्यास एक तास अवधी होता. विमानथांबा लोकांनी गजबजला होता. शाळाकॉलेजांच्या उन्हाळ्याचा सुटीची नुकतीच सुरुवात झाली जोती. त्यामुळे कित्येक कुटुंबे मुलाबाळांसह प्रवासाला निघाली होती. पुढील सहलीचा विचार करत आम्ही विमानात पाऊल ठेवले. लासवेगास जसे जवळ आले तसे खिडकीतून धावपट्टीच्या एका बाजूला पसरलेले विविध कसीनो आणि मोठाली हॉटेल्स दिसू लागली. हा एमजीएम ग्रॅन्ड, हा कसीनो न्यूयॉर्क अशा किलबिलाटाने लासवेगासच्या धावपट्टीवर उतरणारे आमचे आमचे विमान सजीव भासू लागले.

विमानाच्या बाहेर येताक्षणी विमानतळावर नजर जाईल तेथे सट्टाबाजीला उद्युक्त करणारी स्लॉट मशीन्स दिसू लागली. दिव्यांचा झगमगाट, रोषणाई,नाण्यांची खणखण, बियर व इतर मद्ये आणून देणाऱ्या ललना दिसत होत्या. सारे विसरून जुगारात दंग झालेले कित्येक लोक मी अचंब्याने पाहात होते!. २१ वर्षाच्या तरूणापासून तर ८० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत जणु सारे आपले नशीब अजमावायला लासवेगासला आले होते! सट्टाबाजी आणि सौंदर्याची खुली वसाहत म्हणून अमेरिकेत, नेवाडा राज्यात, वसविलेले लासवेगास जगभरात ओळखले जाते.
घरी फोन केला व खुशाली सांगितली. लगेच भावाशी संपर्क साधून त्याला आमचे सामान येते तेथे भेटण्यास सांगितले. आम्हा सर्वांची भेट झाली आणि आमचे सामानही मिळाले. आता सगळ्यांच्या नजरा होत्या ग्रॅन्ड कॅनियनकडे!
स्थानिक वेळेनुसार दुपारचे तीन वाजत होते. नकाशे पाहून मार्गाची खात्री केली. मी ग्रॅन्ड कॅनियनच्या दिशेने गाडी चालवण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने पोटपूजा करून जवळच्या गॅस स्टेशनवर(पेट्रोल पंप) कॉफी घेतली. पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा घेतला. यापुढील प्रवासात गाडीतले पेट्रोल आणि पिण्याचे पाणी याकडे लक्ष देणे आवश्यक होते. वाटते आमचा पहिला थांबा होता 'हूवर धरण'. बोलता बोलता असे लक्षात आले की कॅमेराचे सेल घेतले नाहीत. पुढील प्रवासात आणखी काय विसरले आहे याचे नवीन शोध लागणार होतेच! काही अंतरावर एक गॅस स्टेशन आले.तिथे ते सेल घेतले आणि सर्वजण हूवर धरणाकडे निघालो.
वातानुकुलीत गाडी असूनही उन्हाळा चांगलाच जाणवत होता,काचा गरम होत्या आणि गाडीत ऊन्हाचे चटके बसत होते. काळ्या रस्त्यावर चमकणारे ऊन मृगजळाचा भास निर्माण करत होते. साधारण ताशी ९० मैल अशा वेगाने मी गाडी चालवत होते. गाडीचे गतिरोधक दाबले तर गाडी पाण्यातून घसरणार नाही ना? असा विचार कित्येकदा मनाला स्पर्शून गेला.
लासवेगास मागे पडल्यावर रस्त्यावर अगदी एखादी गाडी दिसत होती. दोन्ही बाजूला नजर जाईल तिथवर वैराण, उजाड प्रदेश. खूप निरखून पाहिले की अगदी क्षितिजाजवळ उंचच्या उंच लांबलचक पर्वताच्या रांगा दिसत होत्या. खरं तर आता रस्त्यावर बरीच गर्दी असेल असा आमचा अंदाज होता. त्यामुळे आपण रस्ता चुकलो नाही ना याची दहा वेळा खात्री केली. जसे जसे हूवर धरण जवळ येऊ लागले तशी रस्त्यावरची गर्दी वाढली. चढावाचा घाटातून जाणारा रस्ता नागमोडी वळणांचा होता त्यामुळे गाडीचा वेग खूप कमी करावा लागला.
धरणाच्या आसपास सर्व गाड्या लावण्याच्या जागा (पार्कीग लॉट्स) भरल्या होत्या. बरेच पुढे गेल्यावर शेवटी एक जागा मिळाली. धरणाकडे चालण्यास सुरुवात केली. उंचावरून दिसणारा धरणाचे दृश्य सुंदर होते. फेसाळणारे निळे हिरवे पाणी आणि त्याच्या प्रवाहाचा जोर! हे धरण स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने एक उत्कृष्ट उदाहरण समजले जाते. त्याची रचना व कार्य समजवून सांगण्याकरता इथे शासनातर्फ़े सोय आहे.
धरणाच्या आजुबाजुला सगळीकडे उंच पर्वत आहेत आणि पर्वताच्या रांगेतून तसेच नागमोडी वळणे घेत वाहणारी नदी दिसते. उन्हापासून संरक्षणाची सर्व खबरदारी घेऊनही कानाला उन्हाच्या झळा जाणवत होत्या, दहा मिनीटे चालताच आम्ही सर्वजण घामाघूम झालो होतो. धरणाचे चित्रण करण्यासाठी मी चलचित्रक सुरू केला. पहाते ते काय समोर सगळीकडे अंधार दिसत होता.
तापमानातील फरकाने लेन्स वर बाष्प जमा झाले होते, त्याचे हात लावताच तयार होणारे पाण्याचे थेंब पुसूनही दोन्ही चित्रके(कॅमेरे) काम करेना. छायाचित्रांपेक्षा चलचित्रीकरणाने बघणाऱ्याला खरी अनुभूती येते. भारतात परत गेल्यावर आई बाबांना भेटायला घरी येणाऱ्या प्रत्येकाला अमेरिकेतील निसर्गाचे दर्शन घडवण्याच्या 'पुण्याला' मी मुकणार होते! चलचित्रीकरणातून माहितीपट तयार करण्याची एवढी मोठी संधी मी गमवणार होते.
अखेर थोड्या वेळाने बाष्प तयार होणे थांबले. शिवाय गडबडीत मी कोणतीतरी चुकीची कळी दाबली होती. बराच वेळ खटपट केली. अखेर सर्व अंधारवणारी चलचित्रकाची कळी सापडली. एकदाची दोन्ही चित्रके (कॅमेरे)सुरू झाली. मला चलचित्रीकरण करता आले.
आजुबाजुच्या वैराण भागातून वाहणारी ही नदी म्हणजे एक आश्चर्यच होते. खुरटी झुडपे आणि कॅक्टसशिवाय कोणतीही झाडे नजरेच्या टप्प्यात नव्हती. उन्हाचा तडाखा जबरदस्त होता. असेच ऊन पूर्ण सहलीत राहिले तर सगळ्याच स्थळांना अगदी धावती भेट द्यावी लागणार होती. हूवर धरणाचा निरोप घेऊन आम्ही ग्रॅन्ड कॅनियनचा मार्ग धरला. परतीच्या प्रवासाचा मार्ग वेगळा होता. आम्हाला तेंव्हा धरणाचे जवळून दर्शन होणार नव्हते.

ग्रँड कॅनियन भेट
पुढील चार तासाचा प्रवास वैराण भागातूनच होता. विविध आकारांचे पर्वत, दिसणाऱ्या खुरटया झुडपातील व कॅक्टसमधील वैविध्य हाच काय तो विरंगुळा होता. मातीचा रंग तांबडा पिवळा असा होता. मध्ये काही अंतरावर इंडियन विलेज किंवा इंडियन वस्तू मिळण्याची दुकाने रस्त्यालगत दिसायची. हे इंडियन म्हणजे अमेरिकेतील रेड इंडियन जमातीचे लोक. त्यांनी कलाकुसर करून विणलेल्या टोप्या, मण्यांच्या माळा आणि विविध प्रकारच्या काठ्या, प्राण्याच्या कातडीच्या शोभिवंत वस्तू व काही फळे अशांची दुकाने त्यांनी रस्त्यालगत थाटली होती. एकही पेट्रोल पंप, बर्गर किंग, मॅक्डॉन्ल्डस ही उपहारगृहे वा नेहमी आढळणारे वॉलमार्ट हे दुकान दिसले नाही. तीन तास गेल्यावर खूप दूरवर काही निळ्या जांभळ्या पर्वतरांगा दिसू लागल्या. मावळत्या सूर्याची किरणे त्या पर्वतशिखरांवर पडल्याने रंगांची होणारी उधळण मनमोहक होती.
'ग्रँड कॅनियन अमुक अमुक दिशेला आणि किती मैलांवर आहे ' अशी माहिती देणारे फलक दिसू लागले. जवळच्या गावात असणारी हॉटेल्स व उपाहारगृहे यांच्या जाहिरातीमोठ्या फलकांवर होत्या. तेथे जाणाऱ्या प्रवाश्यांना राहण्याची सोय करता यावी यासाठी त्यांचा उपयोग होतो. बाहेर अंधारू लागले होते. आम्ही आमच्या खोलीवर पोहोचलो. आंघोळ करून गावात पायी फिरायला गेलो.
मॅक्सिकन जेवणात मक्याची पोळी, एखादी चवळीसारखी उसळ, कांदा, ढोबळी मिरची, कोंथंबीर, दही , परतलेल्या इतर भाज्या व भात असा समावेश असतो. जेवणाआधी मकयाच्या पापडांबरोबर झणझणीत अशी टोमॅटो, कोथिंबीर ,लसूण आणि कांद्याची चटणी असते. त्याला 'सालसा' असे म्हणतात. भारतीय जेवणाच्या जवळचे आणि त्या गावातील खास नावाजलेले म्हणून एका मॅक्सिकन उपहारगृहात त्या रात्री जेवण केले. गावातील हौशी कलाकारांचा एक ताफा तिथे होता. त्यांचे संगीत कितीतरी वेळ कानात रेंगाळत होते. मॅक्सिकन उपहारगृहात मिळणारे 'मार्गारिटा' हे खास शौकिनांचे आवडते मद्य आहे. संगीताच्या तालावर कित्येक अमेरीकन युगुले देहभान हरपून जेवणाचा आणि मद्याचा आस्वाद घेत होती.
पहाटे उठून ग्रॅन्ड कॅनियनला सूर्योदय पाहण्याची इच्छा होती. ते शक्य झाले नाही तरी लवकर उठून आवरून तयार झालो. न्याहारी केली. जवळच असणाऱ्या एका दुकानात काही फळे, ब्रेड, जॅम आणि पाणी अशा जिनसा घेतल्या. आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. अर्ध्या तासात आम्ही ग्रॅन्ड कॅनियच्या दक्षिणी भागाचा(साऊथ रीम) टप्पा गाठणार होतो. हा प्रवासमार्ग खूप प्रेक्षणीय आहे, अशा रस्त्यांना 'सिनीक ड्राइव्ह' असेच नाव अमेरिकेत आढळते.
वळणादार नागमोडी रस्ते, काही घाट होते. तुरळक प्रमाणावर आढळणाऱ्या फळबागा होत्या. काही वेळा शेजारी येणारे पर्वत होते. तर कधी दूर दिसणाऱ्या निळ्या जाभंळ्या तांबड्या डोंगर रांगा पूर्ण रस्त्याभर आमचा पाठलाग करीत होत्या. ह्याच ग्रॅन्ड कॅनियनच्या रांगा. ग्रँड कॅनियन राष्ट्रीय उद्यान अरिझोना राज्यातील कोलोरॅडो पठारावर (प्लॅटूवर) आहे. अमेरीकेच्या त्या भागाचे वैशिष्ट्य असलेल्या उंचवटे व घळयांनी हा प्रदेश सजला आहे. पाण्याच्या प्रवाहानी दगडांचे सुळके तयार झाले आहेत. खूप उंचीवरील प्रदेशात जंगले आहेत.कमी उंचीवरील प्रदेशात वाळवंटी घळईंच्या रांगाच रांगा आहेत. ग्रँड कॅनियनमधील सर्वात खोल भागाची खोली साधारण ६००० फूट आहे.
अमेरीकेतल्या सर्व राष्ट्रीय उद्यानात काही प्रवेश शुल्क आकारतात. सर्व उद्यानात वर्षभर उपयोगात आणता येईल असा एक 'पास' मिळतो. वाहनचालकाची माहिती दाखवून त्याच्या कुटुंबियाना वापरता येईल असे त्याचे स्वरूप असते. आम्ही तो पास व उद्यान्याची माहिती पत्रके घेतली. (टीप पहावी)
ग्रॅन्ड कॅनियनचा सर्व परिसर गजबजला होता. सगळीकडे निळ्या, जांभळ्या, तांबड्या रंगाच्या पर्वत रांगा दिसत होत्या. सूर्यकिरणे त्यांच्यावर पडून विविध रंग चहूबाजुला फेकीत होती. डोंगरांचे विविध आकार दिसत होते. त्या आकारांवरून त्यांना नावे दिली होती. त्यातील काही नावे 'ब्रम्हा टेंपल', 'विष्णू टेंपल' आणि 'शिवा टेंपल' अशी आहेत. ठिकठिकाणी कठड्यांची सोय करून छायाचित्रीकरण करता येईल अशी बांधणी होती. मोठे माहितीफलक होते. त्यावर विविध शिखरांची उंची, घळईच्या भागाची खोली, पर्वतात सापडणारी खनिजे, दगडांचे प्रकार यासर्वांची शास्त्रीय माहिती दिली होती.
ग्रँड कॅनियनचा दक्षिण भाग समुद्रसपाटीपासून साधारण ७००० फूट उंचीवर आहे. दूर्बीणीने दूरवर डोंगरातून घळया दिसत होत्या. त्यांच्या कडेने जाणारा एक पाण्याचा प्रवाह वाहत होता. तो प्रवाह म्हणजे कोलोरॅडो नदी. ही नदी कॅनियनच्या काही भागातूनच दिसते. कॅनियनच्या वरच्या भागापासून थेट नदीपर्यंत जाऊन व तसेच वर चढून येण्यास साधारण दोन दिवस लागतात. तसे करणारी अगदी तरबेज मंडळी पहाटेच खाली उतरण्यास सुरूवात करतात. नदीकाठी रात्री मुक्काम करण्यास पूर्वपरवाना लागतो. अशी माहिती आम्हाला मिळाली.
आम्ही 'डेसर्ट विह्यू ड्राईव्ह', 'रीम ट्रेल' नावाच्या पायवाटांनी जवळ जवळ सर्व दक्षिण भाग बघितला. तसेच काही भाग गाडीने प्रवास करून आणि ठराविक पॉइंटचे दर्शन घेऊन आम्ही बघितला. दुपारी सूर्यप्रकाशात कॅनियनचे रंग थोडे फिकट दिसतात. सकाळी आणि संध्याकाळी ते खूप चमकदार असतात. डोक्यावर व दूर समोर निळ्या रंगाच्या विविध छटा दाखवणारे आकाश दिसते. त्याच्या पुढे नारिंगी, तांबडे, जांभळे, निळे, हिरवे अशा विविध रंगछटांची वळ्यावळ्यांची मखमल पांघरून उभ्या पर्वतशिखरांच्या रांगाच रांगा! यासर्वांमध्ये डोकावणारी काही तुरळक झुडपे आणि चिमुकली कॅक्टसची फुले! हे दृश्य पुन्हा पुन्हा पाहूनही मनाचे समाधान होत नव्हते. सगळे छायाचित्राच्या व फितीच्या स्वरूपात साठवले तरी कमीच होते.
दुर्बीणीतून कोलेरॅडो नदीचा प्रवाह आणि डोंगरातील पायावाटा दिसत होत्या. तिथेच बराच वेळ राहावे असे वाटत होते. ग्रँड कॅनियनला डोळ्यात साठवून आम्ही पुढील प्रवासास निघालो. वाटेतून एका बाजुने एक दीड तास त्याच तांबडया जांभळ्या पवर्तरांगा आणि दूरवर खोल वाहणारी नदी दिसत होती. आता आम्हाला वेध लागले होते"मॉन्युमेंट व्हॅलीचे".

मॉन्युमेंट व्हॅली
अरिझोना आणि उटा या राज्याच्या सीमेवर मॉन्युमेंट व्हॅली आहे. हा प्रदेश नवाहो इंडियन जमातीच्या अधिकारात आहे. वालुकाश्माने एके काळी हा प्रदेश व्यापला होता. त्यांच्या हजारो फूट उंच विविध आकाराच्या अवशेषांनी ही मोन्युमेंट व्हॅली तयार झाली आहे. लाल तांबड्या एकमेकांपासून दूर उभ्या विविध आकृत्या वाळवंटी प्रदेशात आपले लक्ष वेधतात. चित्रपट, जाहिराती, पर्यटन व सहलींच्या पुस्तकात ही निसर्गनिर्मित शिल्पे कित्येकांनी बघितली असतील. प्रत्यक्षात त्यांचे रंग तसेच चमकदार आहेत.
बाहेरच्या मोठ्या रस्त्याने(हायवे यूएस 163 AZ and यूएस 183 utah )जाताना बरीच शिल्पे बघता येतात. साधारण १७ मैल कच्च्या रस्त्याने 'नवाहो' जमातीच्या ह्या आरक्षित जागेतून फिरताना त्यांचे जवळून निरीक्षण करता येते. त्या शिल्पांच्या आकारांवरून त्यांना नावे दिली आहेत.
उन्हाचा चटका खूप जाणवत होता. रखरखीत वाळवंटात वाऱ्याने तांबड्या धुळीचे लोट उडत होते. काही आकार एवढे मोठे आहेत की त्यांचे छायाचित्र 'पॅनोरॅमिक व्हू' शिवाय घेता येणे शक्य नाही.
एकमेकांपासून काही अंतरावर उभे पण सलग्न असे तीन सुळके दिसतात. त्यांचे नाव 'थ्री सिस्टर्स' असे आहे. थोरली आणि मधली साधारण सारख्या उंचीच्या बहिणी असाव्यात. त्यांची धाकटी बहीण रुसून जरा दूर उभी आहे असे त्यांच्याकडे पाहिले की भासते. दोघीजणी आता धाकटीची कशी समजून घालावी याची सल्लामसलत करत आहेत अशा विचारात दिसतात.!
काही आकारांनी दिलेली नावे मजेशीर आहेत. अर्थात ही नावे खूप पूर्वी संशोधकांना जसे आकार दिसले त्यानुसार दिली आहेत. माहिती केंद्राजवळ दिसणारा एक भला मोठा उंचवटा म्हणजे 'एलिफंटस् बट्' ! हा आकार अजस्त्र व उंच आहे. एखादी शेपटी असावी असाही भास होतो त्यामुळे त्याला असे नाव दिले असावे. असेच 'कॅमल बट्' सुद्धा आम्ही पाहिले.
माहिती केंद्राजवळून 'इस्ट आणि वेस्ट मिटन बट्स' असे दोन आकार लक्ष वेधतात. कच्च्या रस्त्यावरून गाडीने जाऊन आम्ही प्रत्येक आकार पाहत होतो आणि त्यांचे छायाचित्रण करत होतो.
निळ्या आकाशात काही पांढरे ढग रेंगाळताना दिसत होते. उन्हाची चमकती किरणे त्यावर पडत होती. ह्या आकृत्यांचे लाल तांबडे रंग अधिकच उठावदार होत होते. या प्रदेशात तांबडी लाल भुसभुशीत माती आहे. सर्व दूर काही अंतरावर पसरलेले असे उंच पसरट आकार आणि त्यांच्या जवळची खुरटी हिरवळ असे दृश्य वारंवार दिसत होते. आम्ही प्रत्येक आकाराकडे पाहून याचे नाव काय असावे असा अंदाज करत होतो.
बरेच दूरवर 'ईगल मेसा' असा खूप पसरट आकार दिसला. त्याची भव्यता पाहून डोळे दिपले. गेली कित्येक वर्षे वातावरणाचा परिणाम होत असूनही ह्या आकृत्या फारशी पडझड न होता टिकून आहेत. काही ठिकाणी आकाराच्या पायथ्याशी थोडे घरंगळलेले दगड व भुसभुशीत माती दिसते. पायथ्याशी साठू लागलेला दगडामातीचा थर कालांतराने वाढून नवीन आकार निर्माण करतील असेही मनात आले.
प्रत्येक वेळी गाडीतून चढ उतर करत होतो. त्यावेळी इतर गाड्यांमुळे उडणाऱ्या धुळीने आम्हाला तांबड्या रंगाने माखले होते. इतर सहप्रवाशांची अशीच स्थिती होती. 'ओर्गन' च्या आकाराचा एक मोठा उंच दगड ह्या व्हॅलीत आहे. त्याचे नावच आहे 'ओर्गन रॉक'.
'मॉन्युमेंट व्हॅली' सारखीच शिल्पे पुढे बराच काळ रस्त्यावर दिसतात. पण जी भव्यता आणि विविधता ह्यांमध्ये आहे तेवढी इतर ठिकाणी दिसली नाही. त्यापैकी 'मॅक्सिकन हॅट' अशा नावाचे शिल्प खरच आश्वर्य वाटावे असे आहे. एखाद्या माणसाने एक मोठी 'टेक्सास स्टाइल' टोपी (हॅट) घातली आहे, अशी एक आकृती वाळवंटात तयार झाली आहे. माणसाचे डोके असावे असा एक गोलाकार दगड आणि त्यावर मोठा आडवा गोलाकार दगड अशी त्याची रचना आहे. हवामानाचा परिणाम किंवा मोठे वादळ अशा कोणत्याही कारणांमुळे डोक्याच्या आकाराचा दगड पडू शकतो. असे झाले तर ते शिल्प काळाच्या पडद्याआड जाण्यास वेळ लागणार नाही.
साधारण तासाच्या अंतरावर आणखी काही आकार/शिल्पे आहेत. त्या भागाला 'व्हॅली ऑफ गॉड्स' असे नाव आहे. त्या भागात काही आकृत्यांना मंदिरासारखा आकार दिसला. एक आकृती ध्यानस्थ माणसासारखी दिसत होती. विविध आकृत्या बघत असताना वातावरण ढगाळ झाले होते. आम्ही ब्राईस कॅनियनकडे जायला सुरुवात केली. परतीचा रस्ता मॉन्युमेंट व्हॅलीहूनच होता. तेंव्हा मॉन्युमेंट व्हॅलीचे ओझरते दर्शन घेऊ असा विचार मनात आला.
दुपारचे चार वाजत होते. आम्ही मॉन्युमेंट व्हॅलीजवळ येत असतानाच जोराचा वारा वाहू लागला. लाल तांबड्या मातीचे लोट रस्त्यावर दिसू लागले. त्या निर्जन भागात रस्त्यावर एखादीच गाडी होती. हे नक्की कोणते वादळ आहे ते कळण्यास मार्ग नव्हता. वाऱ्याचा जोर एवढा होता की गाडी हालत होती. समोरचे अंधुक दिसत होते त्यामुळे गाडी चालवणे अशक्य होते. अंधारून आले होते. काही मिनिटातच जोराच्या पावसास सुरुवात झाली.
साधारण पंधरा वीस मिनिटाच्या त्या निसर्गाच्या रौद्र रूपाने आम्ही निःशब्द झालो होतो. पावसामुळे धुळीचे लोट मावळले. त्यामुळे गाडी चालवण्यास सुरुवात केली. काही तासातच आम्ही रणरणते ऊन, जोराचे वादळ, मुसळधार पाऊस असे विविध अनुभव घेतले होते. हवेत छान गारवा आला होता. ब्राईस कॅनियन जवळ आम्ही एका अमेरिकन कुटुंबाच्या घरी 'ब्रेड ऍन्ड ब्रेकफ़ास्ट' अशा पद्धतीनुसार रहाणार होतो. ते ठिकाण अजून ५ तासाच्या प्रवासावर होते. काही वेळानंतर छान संधिप्रकाश होता. काही गावात शेती, फळबागा दिसत होत्या. सगळा रस्ताभर दूरवर पर्वतांच्या विविधरंगी रांगा दिसत होत्या. ह्या रस्त्याला सुद्धा' सिनीक हायवे' असे नाव होते.
आम्ही ब्राईस कॅनियन जवळच्या गावात पोहोचलो. तोवर रात्रीचे साडे नऊ झाले होते. एका हॉटेलात आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणाची चौकशी केली. आमच्या यजमान कुटुंबाला फोन केला. आमच्या जवळच्या रस्त्याच्या खाणाखुणांची खात्री केली. आम्ही थकलो होतो, अंधारात रस्त्याची नावे दिसेना. अर्धा तास भटकलो तरी घर सापडेना. शेवटी तशा प्रकारचे दुसरे 'ब्रेड ऍन्ड ब्रेकफ़ास्ट' चालवणाऱ्या एका अमेरिकन कुटुंबाच्या दारावर टकटक केले. बाहेर चांगलाच गारठा होता. त्या आजोबांनी त्यांची गाडी सुरू केली. आम्हाला त्यांच्या मागे येण्यास सांगितले. दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती. अशा प्रकारची मदत ते एकमेकांना नेहमी करतात अशी माहिती त्यांनी दिली. अखेर त्या अमेरिकन आजोबांच्या मदतीने आम्ही इच्छित स्थळी गेलो. त्यावेळी माणुसकीच्या दर्शनाने आम्ही भारावलो होतो. सत्तरीच्या जवळची काही जोडपी आपल्या घरात अशी पाहुण्यांची सोय करतात. नोकरचाकराविना सगळी कामे करतात. त्यातून आपले उत्पन्न मिळवतात. आजोबा आजींनी सकाळी सात वाजता नाश्ता तयार असेल असे सांगितले. ऊबदार दुलईत आम्ही केंव्हा झोपलो ते कळलेच नाही. सकाळी जाग आली तेंव्हा उन्हाच्या किरणात ब्राईसच्या रांगा चमकत होत्या.

ब्राईस कॅनियन
जून महिना सुरू होत होता तरी बाहेर तापमान ३५डिग्री फॅ. होते. बरोबर घेतलेले लांब बाह्यांचे कपडे आणि स्वेटर्स चढवले होते तरीसुद्धा गारवा जाणवत होता.
यूटा (दक्षिणेकडे याचा उच्चार उटा असा ऐकला आहे)राज्यात असलेला ब्राईस कॅनियन त्याच्या 'ऍम्फिथिअटर्स' करता प्रसिद्ध आहे. घोड्याच्या नालेच्या आकाराचे असे अनेक ऍम्फिथिअटर्स एकमेकालगत पठारावर तयार झाले आहेत. जमिनीची धूप व वातावरणाच्या परिणामाने असे अनेक आकार निर्माण होतात. त्यामुळे रंगीबेरंगी असे चुनखडक(लाईमस्टोन), वालुकाश्म(सॅन्डस्टोन) आणि मुरूमाचे दगड विविध आकारात बदलले आहेत.काही रंगीबेरंगी उभट आणि वलीय सुळके आहेत. तर काही पसरट (फीन्स)शिखरे आणि इतर एकमेकात गुंतलेले आकार जागोजागी तयार झाले आहेत.
ब्राईस कॅनियन पाहण्यासाठी छोट्या पायवाटा आहेत. ह्या सर्व विविध आकारांना जवळून पाहता यावे म्हणून अनेक ठिकाणी विशेष जागा तयार केल्या आहेत. पायवाट उंचावरून सुरू होते. तयार झालेल्या विविध आकारांच्या पायथ्यापर्यंत अनेक दिशांनी जाते. ह्याच छोट्या पायवाटा (ट्रेल्स).
एका ठिकाणी आम्ही उभे राहिलो. नजर जाईल तेथे गोलाकार पसरलेले गुलाबी, लाल, तांबडे, जांभळे असे नानाविध रंगाचे व आकारांचे सुळके दिसत होते. काही वळ्यावळ्याचे होते, काही ओबडधोबड होते तर काही पसरट होते. काही सुळके अणकुचीदार होते. काही वळ्यांनी एकमेकांत अधिकच गुंतलेले. अशा ह्या वळणावळणाचे सुळक्यातील पहिले वळण किंवा वलय कुठे असावे ते शोधताना नजर खाली घळईत कितीतरी फूट खोलवर जात होती.
आम्ही उभे होतो ते एक मोठे 'ऍम्फिथिएटर' होते. ह्या जागेचे वैशिष्ट्य असे की तुम्ही गोलाकार नजर टाकली की तुम्हाला सभोवती हे विविध आकार दिसतात. तुम्ही गोलाकार चित्रपटगृहात बसले आहात अशी कल्पना करा. अगदी वरच्या रांगेपासून बघितले असता जशा खालच्या रांगेतल्या खुर्च्या दिसतात तसेच अशा आकारांचा भलामोठा पट्टा किंवा समूह जास्त उंचीवरून कमी उंचीकडे जातो आहे असे भासते. असे अनेक पट्टे आम्हाला दिसत होते.
ब्राईस कॅनियनच्या काही भागांची उंची समुद्रसपाटीपासून साधारण ६००० ते ९००० फूट आहे. त्यामुळे चढावावर धाप लवकर लागते. सर्व वलीय सुळके जवळून पाहता यावे म्हणून आम्ही एक पायवाट निवडली. उत्साहाने आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. वेगवेगळ्या सुळक्यांचे रंग आणि वैशिष्ट्ये बघत होतो. जेवढी छायाचित्रे घेतली तेवढी कमीच वाटत होती. सगळे पाहण्याच्या नादात आम्ही बरेच अंतर उतरून गेलो. माती भुसभुशीत होती. उतरताना वेग कमी राहावा या प्रयत्नात गुडघ्यावर जोर येत होता. वर चढून येताना मात्र आमची दमछाक झाली होती. त्याचा एक फायदा झाला तो म्हणजे आम्हाला थंडी वाजणे कमी झाले होते. पुढे त्याच दिवसात झायन कॅनियनवर आणखी एक मोठी पायवाट चढायची होती त्यामुळे आम्ही ब्राईसमधील 'हायकिंग' आवरते घेतले. आमच्या बरोबर अमेरिकन आणि इतर एशियन सहप्रवासी खूप होते. त्यात अशा पायवाटांवर चढ उतर करणाऱ्यात फक्त अमेरिकनांचा अग्रक्रम होता. क्वचित एखादा भारतीय विद्यार्थ्यांचा गट अशा मोहिमेत दिसत होता. हीच गोष्ट मला माझ्या आधीच्या सहलीतही प्रकर्षाने जाणवली होती.

बंडाळी आणि आबा

बंडाळी आणि आबा
"बंडाळीला आता उन्हातच उभे करायचे का?सगळीकडे किती खेळण्यांचा प्रसारा घातला आहे तिने. थांब बंडाळी, अग कुठे आहेस?ही बंडाळी पहा वेडेपणा करते आहे.आता आम्ही तिला कोपर्‍यातच उभे करणार आहे ऐकले नाही तर. हो की नाही मनु?"
मग मनुची स्वारी आबांबरोबर मुकाट्याने सारी खेळणी आवरायला लागयची. आबांना वेळोवेळी असे बंडाळीला, त्यांच्या नातीच्या बाहुलीला खोटे खोटे रागवावे लागायचे. ते औषध मनुला लागू पडायचे.
आजकाल दुकानात मिळणार्‍या बाहुल्यांसारखी सुंदर आणि सुबक नसली तरी आबांनी, आजीचे पातळ वापरुन स्वतः केलेली बाहुली मनुचा जीव की प्राण होती. मनुच्या भातुकलीच्या खेळात पाणी, माती आणि रंगात न्हाऊन निघालेली बंडाळी आजोबा आणि नातीच्या स्नेहाचे प्रतीक होती. वेळप्रसंगी बंडाळीला बुकलून काढ्णार्‍या मनुला दुसरे कुणी आपल्या बाहुलीला त्रास देणार ही कल्पना असह्य होती, अगदी आबांनी सुद्धा बंडाळीला हात लावायचा नाही. मग करणार काय? मनुसमोर आबांचे ऐकण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हताच.त्यामुळे बंडाळीला रागावण्याची आबांची युक्ती अचूक होती.
शाळेतून निवृत्त झालेले,पांढरे धोतर नेसणारे, मनुचे लाड करणारे आबा, शेजारीपाजारी आबा म्हणूनच ओळखले जायचे. आजी शाळेतून घरी येईपर्यंत मनुला सांभाळण्याची आणि तिचे सारे हट्ट पुरवण्याची जबाबदारी आबांची असे.
घरात आजीने केलेल्या पोळ्या संपल्या आहेत याचा सुगावा मनूला कसा लागायचा कुणास ठावूक. नातीचा पोळीचा हट्ट पूर्ण करण्याकरता आबांना मग स्वयंपाकही करावा लागायचा. जरा चूक झाली की इतरांना आबा धारेवर धरायचे पण मनुला पाहताच त्यांचा राग चटकन पळायचा. घरातले पहिले नातवंड म्हणून मनुचा अधिक लाड व्हायचा यात काही शंकाच नव्हती.
एके दिवशी जत्रेत फ़िरतांना बंडाळी हरवली. बंडाळी हरवली तरी आजोबा आणि नातीचे नाते दिवसागणिक अधिक दृढ होत गेले. खेळता खेळता मनू आबांना प्रश्न विचारी व आबा तिला समजेल अशा शब्दात शंकानिवारण करीत. "आबा, तुमच्या डोक्यावर केस का नाहीत, कुणी नेले?धोतर पांढरेच का नेसता?" "आबा, तुमचे दात कुठे आहेत."अशा प्रश्नांची आबा गमतीदार उत्तरे देत.
आबा आपल्या आरामखुर्चीवर तासनतास बसून वर्तमानपत्रे, मासिके आणि मोठाली पुस्तके वाचत असत. नंतर ते आपल्या वह्यांमध्ये त्यावरील आपला प्रतिसाद खरडीत. तेव्हा मनुसुद्धा कोर्‍या पानांवर पेनाने रेघोट्या मारत आबांसारखी लिही. आबांची शेजार्‍यांबरोबर, घरी येणार्‍या स्नेह्यांबरोबर, राजकारण, तंत्रज्ञान आणि ज्योतिष याची चर्चा आणि वादविवाद पाहून मनू मग आपल्या खेळण्यांसमोर तशाच तावातावात हातवारे करत बोलायची.
काळाचे चक्र पुढे गेले, मनु मोठी होत गेली अन आबा थकत गेले. चालण्याची गती कमी झाली तरी त्यांचा मैलोंमैल चालण्याचा उत्साह कायम होता,चष्म्यातून पुसट होत जाणारी अक्षरे वाचण्याचा जोम कायम होता.दसरा, दिवाळी, वाढदिवस अशा निमित्त्याने मनुला भेटी देण्याचा क्रमही सुरु होता. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या मनुचे पाककलेचे प्रयोग फ़सलेले पाहिले की आबा आणि आजी "वा! चहा करावा तर मनुने" असे म्हणून खूप हासत. मनू आणि आबांच्या क्रिकेटच्या गप्पा सुरु झाल्या की आजी, "तुमच्याच तालीमीत तयार झाली आहे ती "असे म्हणत स्वयंपाकघरात जाई.
आजी गेली...जवळचे मनुष्य जाण्याचा मनुचा पहिला प्रसंग. कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे उभे राहणार्‍या आईच्या डोळ्यात मनूने पहिल्यादा अश्रू पाहिले. नातवाचे सगळे नीट करेन अशा आजीला दिलेल्या वचनाकरता आबा मागे राहिले. सुखाने संसार कर असा आबांचा आशीर्वाद घेवून मनू लग्नानंतर परदेशी आली. आपल्या मुलीला बंडाळी आणि आबांच्या गोष्टी सांगतांना मनूचे मन भूतकाळात जायचे. आपल्या पणतीला आबां फ़ोनवरुन आशीर्वाद द्यायचे.
आज ती बंडाळी नाही आणि आबा पण नाहीत...पण आबांच्या मायेच्या छायेत संस्कारांचे बाळकडू मिळालेली मनू समर्थपणे अशाच एका रोपट्याला वर्षानुवर्षे मनात जपलेली शिकवण देते आहे.

मानसी

मानसी
"आई, तुला आणि बाबांना लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!" असे म्हणत सलीलने शैलजाला एक मोठ्ठा गुलाबाचा गुच्छ, एक सुंदर भेटकार्ड आणि एक छान पुस्तिका दिली. उत्सुकतेने शैलजा ती उघडून वाचायला लागणार तेवढ्यात दारावरची घंटा वाजली. "आई मी बघतो कोण आले आहे ते",असे म्हणत सलील पळत गेला. शैलजाने उत्सुकतेने पहिले पान वाचायला सुरुवात केली. महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आपल्या मुलाने प्रेमावर, फ़ुलांवर, पानांवर , खळखळणाऱ्या झऱ्यावर केलेल्या, बागणाऱ्या हरणावर, वेडावणाऱ्या सुगंधावर , बोचणाऱ्या शल्यावर, काळीज हेलावणाऱ्या दुःखावर अशा विविध विषयांवर केलेल्या कविता वाचताना तिचे डोळे भरून आले, झरझर पाने उलटत ती शेवटच्या पानावर पोहोचली. "माझ्या आईस, जिने मला जीवन जगण्यासाठी आहे ही शिकवण दिली." हे वाक्य वाचनाता डोळे पुसत तिने मान वर केली तर सलील एक मोठा पुष्पगुच्छ हातात धरून उभा होता.
"हा कोणाकडून आहे?" "कोणाकडून अपेक्षित आहे?"
असे विचारताना दोघांनाही हसू आले. आपल्या पतीला,शैलेशला आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात राहील याची तिला खात्री होतीच पण कार्यालयीन कामापुढे जेवायला बाहेर नेणे त्याला जमणार नाही याची तिला पुसटशी कल्पना होती."काय म्हणतात तुझे बाबा ?मला कुठे जेवायला नेणे जमणार आहे का त्यांना ?"असे विचारत आलेल्या भेटकार्डावर नजर टाकली.
"नाही. बाबांना एक महत्त्वाची मिटींग आहे , वेळेवर ठरली असे दिसते. "
"मग सलील तुला घरी जेवायचे आहे का आपण जायचे बाहेर?" असे आईने विचारताच सलील ने चटकन आपल्या आवडत्या उपहारगृहाचे नाव सांगून टाकले. "काय रे मी केलेला स्वयंपाक आवडेनासा झालेला दिसतोय?"
" आई, तसे नाही ग .सकाळी तुला आराम, नाहीतरी संध्याकाळी बाबांच्या आवडीचे करण्याचा तुझा बेत आणि तयारी मला दिसतेच आहे. "अस होय, स्वयंपाकघरात सकाळीच तुझी नजर चौफ़ेर फ़िरलेली दिसते. आणि हे कुणाकडून आलय तुझ्यात?"आपल्या बाबांची रात्री अपरात्री डबे हुडकून लाडू वडी खाण्याची सवय आठवून सलीलला गालातल्या गालात हसायला आले.

उंच इमारतीतल्या १२ व्या मजल्यावर असलेल्या आपल्या वातानूकुलीत कार्यालयात शैलेश टेबलावर जमलेल्या फ़ायलींच्या ढिगाऱ्यातून एकेक फ़ाईल घेऊन हातावेग़ळी करत होता. स्वतःच्या जिद्दीने, मेहनतीने आणि कौशल्याने तो आज जैविक तंत्रज्ञान क्षेत्रात एक नावाजलेल्या तंत्रज्ञांची संशोधनशाळा चालवत होता. गेल्या एका तपाची वाटचाल त्याला संशोधक ते व्यवस्थापक ह्या सुवर्णमय आलेखातून नेणारी होती. अविरत कष्ट, जिद्द आणि महत्वाकांक्षा याची जोड त्याच्या उपक्रमांना सतत होती. अमेरिकेत आलेल्या ज्या थोड्या भारतीयांनी त्याच्या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरु केला त्यांत शैलेशचे नाव अग्रभागी होते.
एवढेच नसे थोडके म्हणून नाटक क्षेत्रात नाव कमावण्याची, मराठी भाषेला या परप्रांतात रूजवण्याची, वाढवण्याची त्याची सूप्त इच्छा शैलेश नाट्यदिग्दर्शन व आपल्या नाटकांचे अमेरिकेत प्रयोग करून पूर्ण करत होता. भारतातील नावजलेली नाटके त्याच कलाकारांनी अमेरिकेत किंवा अमेरिकेतील हौशी कलाकारांनी करणे हे जेवढे सहज शक्य होते तेवढेच नव्या नाटकाची निर्मिती व त्याचे प्रयोग इथे का यशस्वी होऊ नयेत हा शैलेशचा प्रश्न असायचा. त्याच्या सारख्याच विचारांच्या तीन मित्रांच्या मदतीने त्याने केलेले प्रयोग यशस्वी झाले आणि मग काही काळानंतर इतर राज्यातील मराठी मंडळींचा हरूप वाढत गेला आणि हौशी कलाकारातूनच हळुहळू अमेरिकेत व्यावसायिक रंगभूमी आकार घेऊ लागली. आपल्या गावात व जवळपास च्या गावात नाटकांचे प्रयोग, नव्या नाटकाच्या तालिमी, नाटकासाठी नवे विषय शोधणे यात शैलेशचा शुक्रवार ते रविवार आणि घरी आल्यानंतरचा वेळ कसा जायचा ते कळायचेच नाही. शिवाय मेंदूचा एक कोपरा कायम ह्या विचारांनी व्यापलेला असायचा हे तर सांगायलाच नको. आताही आपली कार्यालयीन कामे पूर्ण करताना पुढच्या नाटकासाठी "मानसी"या लेखिकेने लिहीलेल्या "सखी"कादंबरीचीच निवड करावी हा विचार त्याने मनात पक्का केला होता. तिच्याच कथांवर आधारित दोन नाटकांना प्रचंड यश मिळाले होते. एक नाट्यदिग्दर्शक म्हणून श्रेय शैलेशचे असले तरी मूळ कथाच मनाची पकड घेणारी होती. त्या लेखिकेला शैलेशने जाहीरपणे आपल्या यशात सहाभागी केले होते.
मानसीची ही नवी कादंबरी कौटुंबिक विषयावर होती. तिच्या अनेक कथांना बक्षिसे मिळालेली होती आणि त्यामानाने या कादंबरीला तेवढा प्रतिसाद मिळालेला नव्हता. नाट्यरसिक या विषयाला कितपत उचलुन धरतील याची शंका होती. त्याच्या मित्रांना मोठी जोखीम वाटत होती पण प्रयोग म्हणून त्यांनी त्याला संमती दिली होती. त्या नाटकातील मुख्य भूमिका समर्थपणे निभावू शकेल अशी एकही व्यक्ती डोळयासमोर येत नव्हती हीच शैलेशच्या दृष्टीने मोठी चिंतेची बाब होती. एवढ्यात त्याच्यासमोर त्याच्या सेक्रेटरीने एक भेटकार्ड आणून दिले. मानसीने पाठ्वलेले कार्ड पहाताच त्याला जरा आश्चर्य वाटले आणि ज्या प्रकाशकाने आपल्याला तिचा पत्ता व इतर माहिती देण्यास नकार दिला त्याने आपला पत्ता मात्र मानसीला दिलेला दिसतो. असे मनात येऊन त्याने त्याला चांगले झापायला पाहिजे असे ठरवले. लग्नाच्या वाढदिवसाचे कार्ड पहाताच आपण घरातल्या आपल्या अभ्यासिकेला नक्की कुलूप लावले आहे ना, याची त्याने मनातल्या मनात खात्री केली. नाहीतर सगळ्यावर पाणी फ़िरायचे.! आपल्या पत्नीला आज खास भेट द्यायची त्याने ठरवले होते. तसेच तो तिच्याकडून काही खास भेट मागणार होता. आपल्या कामाच्या व्यापात आपण तिच्याकडे वेळ देणे होत नाही असे निदान आज व यापुढे तरी होता कामा नये अशी त्याने मनाशी खूणगाढ बांधली होती. त्याच्या यशाच्या मागे एक व्यक्ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी होती ती म्हणजे त्याची पत्नी शैलजा. हेच सत्य त्याला मानसीच्या कादंबरीने जाणवून दिले होते आणि म्हणूनच घराघरात घडणाऱ्या या कथेला त्याने रंगमंचावर नेण्याचा निर्णय घेतला होता. तेवढ्यात आलेल्या दूरध्वनीच्या आवाजाने त्याच्या विचारांची श्रृंखला तुटली. "सखी" च्या प्रकाशकाने आज दुपारी त्याच्या कार्यालयात नाटकाच्या हक्काची चर्चा व वितरणाचे मुद्दे पक्के करण्याकरता बोलावले होते.

मानसी आज अमेरिकेतील नावाजलेली लेखिका झाली होती. गेल्या आठ वर्षात तिचे चार कथासंग्रह प्रकाशित झाले होते. तंत्रज्ञानावर आधारित रहस्यमय कथा, विनोदी कथा, बालकथा आणि स्त्रियांच्या समस्यांना वाचकांपुढे आणणाऱ्या कथा अशा विविध प्रकारच्या विषयांवर तिचे लेखन अल्पावधित लोकप्रिय झाले होते. आपल्या असंख्य चाहत्याशी ती पत्राद्वारे व ईपत्रांद्वारे संपर्क ठेऊन असली तरी तिची व्ययक्तिक माहिती तिने कोठेही प्रकाशित केली नव्हती.

गाडीतून उपहारगृहाकडे जाताना शैलजा कोणाचे शुभेच्छांचे फ़ोन आले, भेटकार्डे आली त्याचा विचार करत होती. सगळ्याना आभाराची कार्डे पाठवायला हवीत.येत्या रविवारी गावातल्या मित्रमंडळीना पार्टी देणार आहोत, त्याची सगळी व्यवस्था नीट झाली ना ते सुध्दा पहायला हवे. शैलशने पार्टी मध्ये त्याला काय काय हवे आहे कोणाला बोलवायचे आहे या साऱ्याची यादी तिला दिली होती व तो आपल्या पुढच्या नाटकाची जाहीर घोषणा सुध्दा तेव्हाच करणार होता. आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसात आणि ह्यात किती फ़रक झालाय.. शैलजाचे मत भूतकाळात शिरले होते. एकमेकांनी एकमेकांसाठी दयायचा वेळ कुठे गेला तो तिला शोधून सापडेना.
सलीलच्या जन्मानंतर उच्चशिक्षित शैलजाने आपली संगणकक्षेत्रातली नोकरी सोडून घराकडे पूर्ण वेळ दयावा अशी सगळयांची इच्छा त्यामुळे शैलजा घरी होती. आपल्या मुलाच्या संगोपनात कोणतीही कसर राहू नये असेच तिलाही वाटायचे. शैलेशचा कामाचा व्याप वाढत होता. त्यामुळे लहानग्या सलीलला सांभाळणे,तो शाळेत जायला लागल्यावर त्याचा अभ्यास, घरकाम, पाहुणे, मराठी मंडळाचे कार्यक्रम हे करुन मग शैलेशला व्यवस्थापनात सुरुवातीला जमेल तशी मदत करणे हाच तिचा विरंगुळा. तंत्रज्ञानात ज्या गतीने बदल होत जातात त्या गतीने नव्या गोष्टी शिकल्या नाहीत तर लवकरच आपण मागे राहू याची जाणीव असल्याने शैलजा जमेल तसे व्यवस्थापनशास्त्रात नवनविन शिकण्याचा प्रयत्न करत होती. तरीदेखील सारे व्याप सांभाळून आपण पुन्हा संगणकशास्त्रात नोकरी मिळवणे अवघड आहे ह्याची तिला जाणीव होती. सलील मोठा होत गेला आणि दुसरीकडे शैलेशचा व्यवसायात अधिकाधिक जम बसत गेला साहजिकच आता शैलजाच्या मदतीची गरज नव्हती. आपल्या कार्यालयात येऊन तिने काम करण्यापेक्षा तिने दुसरीकडे मन गुंतवावे असे शैलेशचे म्हणणे होते.

आयुष्यात एकाएकी आलेल्या पोकळीची जाणीव तिला गुदमरवून टाकणारी होती. संसारासाठी आपल्या नोकरीचा हट्ट तिला सोडून द्यावा लागला होता, ती जे काही मदतीचे कार्य करत होती ते सर्व करताना तिची ओळख शैलशची पत्नी अशीच होती. आता नोकरी करावी तरी कोणती मिळेल? शैलेशला पटेल? आणि आपल्यात तरी तो आत्मविश्वास उरला आहे का?या प्रश्नांचे काहूर मनात माजले होते. आपल्या एका मैत्रिणीला, तिच्या मुलाने काय करावे व त्याचे परिणाम काय होतील हे सांगत असताना, अचानक शैलजाला आपण खूप काही करू शकतो याची जाणीव झाली. खरच असे मार्गदर्शन हवे असणारे कितीतरी पालक व लहान मुले असतात त्यांच्यासाठी आपण काही केले तर?मग मराठी मंडळात लहान मुलांसाठी संस्कारवर्ग चालवण्यास तिने सुरुवात केली. हळूहळू इतर भाषिक कुटंबातील मुलांनी सहभाग घेतल्याने तिच्या कामाची व्याप्ती वाढली झाले आणि तसाच तिचा आत्मविश्वासही. "स्वतःचे काही सुरु कर" असे शैलेश तिला नेहमीच सांगायचा. "अग काहीच करता आले नाही तर पूर्वी लिहायचीस ना कविता, तश्या कविता लिही." असे शैलेश तिला चिडवायचा आणि खरच शैलजा आता मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी लिहू लागली होती व दिवसेन दिवस तिची प्रतिभा फ़ुलत गेली.त्याचा परिणाम मात्र असा झाला की एरवी घरी राहून कंटाळणारऱ्या शैलजाचा आता वेळ कसा घालवावा याचा प्रश्न न राहिल्याने शैलशने आता आपण अधिक वेळ स्वतःच्या कार्यक्रमांना देऊ शकतो असा समज करून घेतला आणि तो आपल्या ध्येयाकडे कसे जाता येईल यात मग्न राहू लागला. सकाळी चहा पिताना, संध्याकाळी जेवताना असे जे काही थोडेसे संभाषण व्हायचे ते वगळता दोघे कुठे फ़िरायला गेली, एखाद्या गोष्टीवर चर्चा, त्याने शैलजाला चिडवणे, विनोदाने तिला हसवणे या साऱ्याकरता आता वेळच उरला नव्हता. दोघे कुठे गेली तरी त्याचे कारण शैलशचा व्यवसाय व नाटकाशी निकडीत असायचे त्यामुळे तो वेळ आपला नाही असे वाटून शैलजाचे मन आपल्या नात्यात एक औपचारिकता उरली आहे या विचाराने विषण्ण होई.
"आई, अग तू विचारत डावीकडे वळायचे विसरलीस! जेवायला जायचे आहे !तरी मी सांगतो मला चालवू दे गाडी!"आई गाडीत असली की आपल्याला ती गाडी चालवू देत नाही हे आईला सांगण्याची एकही संधी सलीलने आजवर सोडली नव्हती.
जेवता जेवता शैलजाचे मन भूतकाळाचा आढावा घेत होते. ती विचार करत होती. "खर काय कमी आहे आपल्या आयुष्यात? काहीच नाही. सगळी सुखे हात जोडून उभी आहेत. आपण मदतीसाठी वापरेल्या पैशाचा एवढासाही उल्लेख शैलेश कधी करत नाही का हिशोब विचारत नाही. त्याच्या इतर मित्रांसारख्या आपल्याला त्रासदायक ठराव्या अशाही शैलेशला सवयी नाहीत . आहे फ़क्त पुढे जाण्याची आणि करत असलेल्या कामाला वाहून घेण्याची नशा. याच तर गुणांवर आपण किती खूश होतो. आता त्याच्याचमुळे आपल्याला तो अधिक वेळ देऊ शकत नाही. "तिने भांडून रागाऊन, रुसून बघितले होते. पण या कशालाही दाद देणाऱ्यातला आपला नवरा नाही याची तिला खात्री होती. शेवटी तिने परिस्थिती स्विकारली होती. व्यवस्थापन विषयक पुस्तकांमध्ये" तुमचे ध्येय आणि कुटुंब" असे लेख वाचूनही शैलेशवर त्याचा काही परिणाम झाला नव्हता. नवऱ्याकडून आपल्याला जास्त वेळ मिळावा असे तिला वाटायचे तरी "हनी कशी आहेस तू" असे नाटकी आणि दिखावू प्रेमही तिला नकोच होते. आपल्या अहंकारासाठी मुलाचा बळी तर तिला द्यायचाच नव्हता त्यामुळे खंबीरपणे व प्रेमाने आपलयाला पतीचे लक्ष कसे वेधून घेता येईल हेच तिने करायचे ठरवले होते. आपले वडील इतर मुलांच्या वडिलांसारखे माझ्या शाळेत, महाविद्यालयात का येत नाहीत हे सलीलला समजवून सांगताना मात्र तिच्या नाकी नऊ येत असत. त्यावर तिने शैलेशच्या नावाने मुलाला भेटी पाठ्वणे हा मार्ग काढला होता व "एक वडील म्हणून कमीत कमी महिन्यातून दोन वेळा आपल्या मुलगा काय करतो? त्याचे पुढील बेत काय आहेत? यासाठी सलीलला वेळ द्या" असे ठणकाऊन शैलेशला सांगितले होते. त्यामुळेच ईमेल द्वारे इतर वेळी संपर्कात असणाऱ्या पितापुत्रांमध्ये मैत्रीचे नाते राहिले होते.

कामांच्या यादीतून एक एक आटोपून प्रकाशकाच्या कार्यालयात जायला मानसीला थोडा उशीर झाला होता, शैलेश येणार आहे ,त्यांना भेटूनच जा असे प्रकाशकाने म्हणताच मानसीने गडबडीने बोलणे आवरते घेऊन निघण्याचा निर्णय घेतला. पण उशीर झाला होता हे खरे! बाहेर येत असताना दारात उभ्या शैलेशकडे पाहून प्रकाशकाने दोघांची ओळख करून दिली"ह्या पहा मानसी आपल्या नाटकाच्या लेखिका, यांनाच भेटायचे होते ना आपल्याला?, आणि हे शैलेश आजचे प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक! त्याचे वाक्य संपताना मानसी या नावाने उभ्या असलेल्या शैलजाला पाहून शैलेशला आश्चर्याचा धक्का बसला होता आणि शैलजा.. तिला तर काय बोलावे हेच कळेना.."आता जरा घाईत आहे रात्री बोलू "असे म्हणून शैलेश प्रकाशकाशी बोलणे आटोपून निघून गेला तेव्हा शैलजाला आपल्या हातून घडलेल्या चुकीची प्रकर्शाने जाणीव झाली.. अनेक वेळा शैलेशला आपण सांगायचा प्रयत्न केला पण स्पष्ट सांगायचा धीर झाला नाही हे तिचे मन मान्य करत होते.
या घटनेने शैलजाच्या उत्साहावर पाणी पडले होते. यंत्रासारखी इतर कामे आटपून घरी आल्यावर आज सात वाजताच घरी आलेल्या शैलेशला पाहून शैलजा एकीकडे मनात सुखावली होती पण धास्तावली होती यात शंका नव्हती. "मला येऊन बराच वेळ झाला आणि शैली कॉफ़ी तुझ्याकरता केली आहे. गरम आहे. चटकन घे" या उद्गारांनी तर तिला काय बोलावे हेच कळत नव्हते. बहुधा आज "वाढदिवस स्पेशल" वागण दिसतय असे म्हणून ती झटपट स्वयपाकाला लागली. नाहीतर संध्याकाळी आठच्या आत कधी शैलेज घरी आल्याचे तिला स्मरत नव्हते. जेवताना "आई, बाबा आज तू काय करत असतेस घरात हे पहायला आले होते "असे बाबा म्हणतात. "हो ना बाबांचा वेळ जात नाही की काय असे दिसते. मग काय हो काय सापडले तुम्हाला ?"
"खूप काही "चिंतामग्न चेह्ऱ्याने शैलेशने उत्तर दिले. ते पाहून शैलजाने रात्री काही न बोलता आधी स्वतःच माफ़ी मागायचा निर्णय घेतला होता.
रात्री आता अभ्यासिकेतून शैलशला बोलवावे? की त्याने खोलीत यायची वाट पहावी ?या विचारात येरझाऱ्या घालत रात्रीचे बारा वाजायची वेळ आली तेव्हा नेहमीप्रमाणे तिने अभ्यासिकेच्या दारावर हलकेच टकटक केले. दार उघताच पहाते तर काय? तिने पाठ्वलेली सगळी भेटकार्डे, पत्रे, छोट्या नोंदी, अगदी लग्नाआधिपासून ते या वर्षीच्या भेटीपर्यंत शैलेशने सजवून खोलीभर लावले होते. आणि हातात त्याने एक तिने मराठीत लिहीलेले पत्र घेतले होते. डोळे मिचकाऊन त्याने "नवीन कथा कोणती आहे? मी त्यावर नाटक बसवणार आहे बर का!आता यानंतरच्या कथेचा विषय मी सांगणार! त्याला मध्येच थांबत शैलजा "खर म्हणजे मी तुला आधी सांगायला हवे होते सगळ, तुझ्यापेक्षा माझेच चुकले आहे. असे म्हणत स्फ़ुंदायला लागली होती. त्यावर शैलशने तिने दिलेल्या भेटीकडे बोट दाखवत म्हटले "तू दिलेली भेट मला तितकी आवडली नाही. " "आणखी काय हवे आहे? सार काही तुझच तर आहे.""आता आजवर जे दिले नाहीस ते मागणार आहे! रडतेस काय, चुकले काय म्हणतेस, अग चूक तर माझीही आहे. पण ते जाउ दे.आज तो विषयच नको. " माझ्या नाटकात मुख्य भुमिका करशील का?"शैलजाचा आपल्याच कानावर विश्वास बसेना, "चालेल तुला माझे नाटकात काम करणे?""आता तुझे लेखन सांभाळून कसे करायचे ते पहा म्हणजे झाले. मला तरी तुझ्या कथा पूर्ण करता येणार तू जशी माझी ऑफ़िसातली कामे सांभाळते तसे!"शैलेशच्या खांद्यावर विसावताना शैलजाला सारी वर्षे मोरपिसारखी अलगद उडून आपण भूतकाळात तर नाही ना असा भास होत होता. सकाळी दार वाजल्यावर अभ्यासिकेतून बाहेर येत शैलेशने सलीलला विचारले "काय रे काय झाले? कोणाला शोधतोस?" "बाबा गाडी घरात आहे,मग कुठे गेली आई?"
अभ्यासिकेकडे निर्देश करत शैलेशने उत्तर दिले " आई ? माझी मानसी आहे आत , तिला शोधतोस का तू?"ते ऐकून बाहेर येणाऱ्या आईला व हसणाऱ्या बाबांना पाहून सलील मात्र चांगलाच गोंधळला होता.
-सोनाली जोशी