Monday, January 15, 2007

बंडाळी आणि आबा

बंडाळी आणि आबा
"बंडाळीला आता उन्हातच उभे करायचे का?सगळीकडे किती खेळण्यांचा प्रसारा घातला आहे तिने. थांब बंडाळी, अग कुठे आहेस?ही बंडाळी पहा वेडेपणा करते आहे.आता आम्ही तिला कोपर्‍यातच उभे करणार आहे ऐकले नाही तर. हो की नाही मनु?"
मग मनुची स्वारी आबांबरोबर मुकाट्याने सारी खेळणी आवरायला लागयची. आबांना वेळोवेळी असे बंडाळीला, त्यांच्या नातीच्या बाहुलीला खोटे खोटे रागवावे लागायचे. ते औषध मनुला लागू पडायचे.
आजकाल दुकानात मिळणार्‍या बाहुल्यांसारखी सुंदर आणि सुबक नसली तरी आबांनी, आजीचे पातळ वापरुन स्वतः केलेली बाहुली मनुचा जीव की प्राण होती. मनुच्या भातुकलीच्या खेळात पाणी, माती आणि रंगात न्हाऊन निघालेली बंडाळी आजोबा आणि नातीच्या स्नेहाचे प्रतीक होती. वेळप्रसंगी बंडाळीला बुकलून काढ्णार्‍या मनुला दुसरे कुणी आपल्या बाहुलीला त्रास देणार ही कल्पना असह्य होती, अगदी आबांनी सुद्धा बंडाळीला हात लावायचा नाही. मग करणार काय? मनुसमोर आबांचे ऐकण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हताच.त्यामुळे बंडाळीला रागावण्याची आबांची युक्ती अचूक होती.
शाळेतून निवृत्त झालेले,पांढरे धोतर नेसणारे, मनुचे लाड करणारे आबा, शेजारीपाजारी आबा म्हणूनच ओळखले जायचे. आजी शाळेतून घरी येईपर्यंत मनुला सांभाळण्याची आणि तिचे सारे हट्ट पुरवण्याची जबाबदारी आबांची असे.
घरात आजीने केलेल्या पोळ्या संपल्या आहेत याचा सुगावा मनूला कसा लागायचा कुणास ठावूक. नातीचा पोळीचा हट्ट पूर्ण करण्याकरता आबांना मग स्वयंपाकही करावा लागायचा. जरा चूक झाली की इतरांना आबा धारेवर धरायचे पण मनुला पाहताच त्यांचा राग चटकन पळायचा. घरातले पहिले नातवंड म्हणून मनुचा अधिक लाड व्हायचा यात काही शंकाच नव्हती.
एके दिवशी जत्रेत फ़िरतांना बंडाळी हरवली. बंडाळी हरवली तरी आजोबा आणि नातीचे नाते दिवसागणिक अधिक दृढ होत गेले. खेळता खेळता मनू आबांना प्रश्न विचारी व आबा तिला समजेल अशा शब्दात शंकानिवारण करीत. "आबा, तुमच्या डोक्यावर केस का नाहीत, कुणी नेले?धोतर पांढरेच का नेसता?" "आबा, तुमचे दात कुठे आहेत."अशा प्रश्नांची आबा गमतीदार उत्तरे देत.
आबा आपल्या आरामखुर्चीवर तासनतास बसून वर्तमानपत्रे, मासिके आणि मोठाली पुस्तके वाचत असत. नंतर ते आपल्या वह्यांमध्ये त्यावरील आपला प्रतिसाद खरडीत. तेव्हा मनुसुद्धा कोर्‍या पानांवर पेनाने रेघोट्या मारत आबांसारखी लिही. आबांची शेजार्‍यांबरोबर, घरी येणार्‍या स्नेह्यांबरोबर, राजकारण, तंत्रज्ञान आणि ज्योतिष याची चर्चा आणि वादविवाद पाहून मनू मग आपल्या खेळण्यांसमोर तशाच तावातावात हातवारे करत बोलायची.
काळाचे चक्र पुढे गेले, मनु मोठी होत गेली अन आबा थकत गेले. चालण्याची गती कमी झाली तरी त्यांचा मैलोंमैल चालण्याचा उत्साह कायम होता,चष्म्यातून पुसट होत जाणारी अक्षरे वाचण्याचा जोम कायम होता.दसरा, दिवाळी, वाढदिवस अशा निमित्त्याने मनुला भेटी देण्याचा क्रमही सुरु होता. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या मनुचे पाककलेचे प्रयोग फ़सलेले पाहिले की आबा आणि आजी "वा! चहा करावा तर मनुने" असे म्हणून खूप हासत. मनू आणि आबांच्या क्रिकेटच्या गप्पा सुरु झाल्या की आजी, "तुमच्याच तालीमीत तयार झाली आहे ती "असे म्हणत स्वयंपाकघरात जाई.
आजी गेली...जवळचे मनुष्य जाण्याचा मनुचा पहिला प्रसंग. कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे उभे राहणार्‍या आईच्या डोळ्यात मनूने पहिल्यादा अश्रू पाहिले. नातवाचे सगळे नीट करेन अशा आजीला दिलेल्या वचनाकरता आबा मागे राहिले. सुखाने संसार कर असा आबांचा आशीर्वाद घेवून मनू लग्नानंतर परदेशी आली. आपल्या मुलीला बंडाळी आणि आबांच्या गोष्टी सांगतांना मनूचे मन भूतकाळात जायचे. आपल्या पणतीला आबां फ़ोनवरुन आशीर्वाद द्यायचे.
आज ती बंडाळी नाही आणि आबा पण नाहीत...पण आबांच्या मायेच्या छायेत संस्कारांचे बाळकडू मिळालेली मनू समर्थपणे अशाच एका रोपट्याला वर्षानुवर्षे मनात जपलेली शिकवण देते आहे.

No comments: