Monday, January 15, 2007

ग्रॅन्ड कॅनियन

ग्रॅन्ड कॅनियन
ग्रॅन्ड कॅनियन सहलीच्या दरम्यान काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. ह्या लेखमालेत त्या ठिकाणांची माहिती देते आहे. अमेरिकेतील लोकांचे अनुभव, प्रवासाची पूर्वतयारी, विमान प्रवासात येणारे अडथळे याचे वर्णन आणि अनुभव वाचकांपुढे मांडण्याची इच्छा आहे. माहितीजाल वापरून आरक्षणे करताना घेण्याची काळजी, अमेरिकेतील प्रादेशिक वैशिष्ट्ये याची वाचकाला माहिती व्हावी अशी सुद्धा माझी भूमिका आहे. छायाचित्रे लेखमालेच्या शेवटी देणार आहे. शिवाय ती गुगल शोधकाचा वापर करून वाचकांना शोधता येतीलच.
आईवडीलांना या फेरीत जमेल तेवढे अमेरिका दर्शन घडवण्याचा विडा मी उचलला होता. मानवनिर्मित स्थळांपेक्षा आम्हाला निसर्गाची विविधता आवडेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अमेरिकेतील राष्ट्रीय उद्यान दर्शन हा चटकन समोर येणारा एक पर्याय होता.(नॅशनल स्टेट पार्क्स) आईवडीलांनी ग्रॅन्ड कॅनियन, मोन्युमेंट व्हॅली, ब्राईस कॅनियन व झायन कॅनियनला बघायला आवडेल असे सांगितले.
आमच्या सहलीतील प्रवासाचे टप्पे साधारण असे होते-आमच्या गावापासून न्यू ऑर्लीन्स,(ल्युझियाना राज्य) असा एक तासाचा कारचा प्रवास करून विमानतळावर जायचे. त्यानंतर न्यू ऑर्लिन्स ते लासवेगास(नेवाडा राज्य) असा साधारण साडेचार तासाचा विनाथांबा (डायरेक्ट फ्लाईट) विमानप्रवास करायचा. माझा भाऊ टेक्सास राज्यातून लास वेगासच्या विमानतळावर आम्हाला भेटणार होता. त्या रात्री लास वेगास दर्शन व तेथेच रात्रीचा मुक्काम. दुसऱ्या दिवशी चौघांनी पुढे साधारण सहा तासाचा कारने प्रवास करून वाटेतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत ग्रॅन्ड कॅनियनचा पल्ला गाठायचा.
विमानाची तिकिटे,वेगवेगळ्या गावातील राहण्याच्या जागेचे आरक्षण, कार याची व्यवस्था झाली. त्यानंतर सगळ्या सहलीचे अंदाजे वेळापत्रक, विविध राज्यांतून वाहतुकीचे मार्ग दाखवणारे व माहितीचे नकाशे, छायाचित्रक (कॅमेरा),चलचित्रक(व्हिडिओ कॅमेरा)गाण्याच्या ध्वनिफिती, आपापल्या बॅगा यांची जमवाजमव झाली. मेमोरियल डे हा मे महिन्यातील मोठा सप्ताहांत (लॉन्ग विकेंड)जसा जसा जवळ येऊ लागला तशी आमची पहिली वाहिली, एकत्र, कौटुंबिक सहल अगदी नजरेच्या टप्प्यात दिसू लागली.
गावातील काही मित्रांनी,"वा तुमची काय मजा आहे .चौघेजण मस्त फिरा, बिचारा नवरा घेतो आहे मुलीची आणि घराची काळजी! अशी गंमत केली.
एकाने "आता अगदी मुहूर्त पाहून काय जाता आहात? वाळवंटात रखरखणारे ऊन आणि मोठ्या सुटीची केवढी गर्दी !आम्ही सुद्धा हीच सहल केली आहे पण कसे अगदी सगळे नीट आखून , काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन!"असा प्रेमळ सल्ला दिला.अशा सल्ल्यांनी मिनिटा मिनिटाला माझे डोके वाळवंटापेक्षा अधिक तापत होते.
"तुम्हाला तिकिटे कशी मिळाली? ""केवढ्याला मिळाली? हॉटेल कोणती आहेत?त्यांचे दर काय?""बाप रे एवढे महाग" "वा!मजा आहे, छान चापलेत!" अशा संवादांनी आमच्या हितचिंतकांनी माझ्याशिवाय आईवडीलांना दूरध्वनी करून भंडावून सोडले ते वेगळेच.
मग आईबाबांना दरवेळी डॉलरचे रुपयांत हिशोब करतांना पाहून प्रवासाची मजा कमी होईल की काय अशी मला काळजी वाटू लागली. आमच्या जमा झालेल्या 'विमान मैलांतून' (फ्रिक्वेंट फ्लायर माईल्स) तुमची तिकिटे काढली आहेत आणि हॉटेलचा खर्च फार नाही असे त्यांना सांगितले.
कार्यालयातील अमेरिकन सहकाऱ्यांनी सुद्धा ही काळजी घ्या, अमुक करा, तमुक करू नका अशा सूचना दिल्या. कमी अधिक प्रमाणात तिकिटे आणि इतर गोष्टींविषयी उत्सुकता त्यांनी सुद्धा दाखवली. आपल्या माणसांनी, आपल्या भाषेत केलेल्या चौकश्या कदाचित जास्त बोचऱ्या वाटतात. गोऱ्या साहेबाने काही विचारले तरी त्याचा साधा सरळ आणि योग्यच अर्थ घेण्याची गुलामगिरी अजूनही माझ्यातून गेली नाही अशी खंत त्यावेळी मला वाटली.
सर्व आवश्यक गोष्टी घेतल्याची उजळणी करत आमची गाडी न्यू ऑर्लिन्स कडे धावू लागली. भटक्याने(भ्रमणध्वनीने, मोबाईल फोन) भावाशी संपर्क साधला. पुढील एक तासात तो सुद्धा त्याच्या गावातील विमानतळाकडे निघणार होता.
न्यूऑर्लिन्स विमानतळाशेजारील पार्किंग व्यवस्थेत गाडी पार्क केली. तेथून सगळे सामान घेऊन आम्ही एका बसने "चेक इन" करायच्या रांगेत उभे राहिलो.

विमानाची सुटण्याची वेळ एकदा पुन्हा भटक्याने(भ्रमणध्वनी, मोबाईल फोन) संपर्क करून तपासली. आतापर्यंत विमान वेळेवर आहे असे दाखवणारे फलक आता विमान दोन तास उशीरा सुटणार असे दाखवत होते. लगेच घरी पतीला व भावाला दूरध्वनीने त्याची कल्पना दिली. थोडक्यात आमच्या आधी पोचल्यामुळे भावाला लासवेगासला आमची प्रतीक्षा करावी लागणार असे दिसत होते.
विमानप्रवासाच्या वेळापत्रकात असे थोडे फार बदल होऊ शकतात याची आम्हाला कल्पना होती. आई बाबा गप्पा मारत होते. मी अधून मधून बॅगांशेजारी रांगेत उभी राहत होते. जसजशी गर्दी वाढत होती तेंव्हा लोकांशी बोलताना नवीन माहिती मिळाली. याच कंपनीचे काल सुटणारे हेच विमान रद्द झाले होते आणि त्यातील विमानप्रवासी आज आमच्या बरोबर येणार होते. शेवटी एकदाच्या आमच्या बॅगा 'चेक इन' होऊन हातात 'बोर्डिंग पास' मिळाले. आमच्या गप्पा सुरू होत्या. विमानतळावर जवळपास चार तास ताटकळत थांबलो होतो. अखेर ज्याची भिती वाटत होती तेच घडले. रात्री साडेअकराच्या सुमारास अखेर आज सुटणारे आमचे विमान रद्द केल्याची घोषणा कानी आली! विमान कंपनीशी संपर्क करून पुढील प्रवासाचे पुर्नआरक्षण करण्याची व सामान परत घेण्याची आम्हाला सूचना मिळाली. आता काय? असे मोठे प्रश्नचिह्न सगळ्याच्याच चेहऱ्यांवर दिसत होते. चिंतातुर मुद्रेने सामान परत घेण्याच्या ठिकाणाकडे जात असताना सगळ्या हातातील भटके विमान कंपनीशी संपर्क साधू लागले..
एका खेळाडूकडून दुसऱ्याकडे चेंडूफेक करावी तशी टोलवाटोलवी होत शेवटी मला मदत करण्यास समर्थ अशा कर्मचाऱ्याशी दूरध्वनीच्या रांगेत बोलण्याचा माझा क्रमांक लागला. "नमस्कार, माझे नाव मेगन आहे. मी तुम्हाला आरक्षणात मदत करणार आहे. आपण कृपया वाट पाहू शकता का?" असा प्रश्न मंजुळ आवाजात कंपनीच्या स्त्री कर्मचाऱ्याने विचारला."हे देवी माते, आता मला तारणे वा मारणे तुझ्याच हातात आहे." अशा भावनेने मी तिला 'हो' सांगितले.
सुदैवाने आमचे सगळे सामान आम्हाला मिळाले होते. आई बाबांनी अधिक विचार न करता सामानाशेजारी बैठक मारली. शारीरिक श्रमापेक्षा पुढे काय होईल या अनिश्चिततेमुळे त्यांना,मला आणि इतर सहप्रवाश्यांना थकवा आला होता. नवराबायकोची भांडणे, लहान मुलांचे रडणे, किरकिर आणि दूरध्वनीवरील तावातावाची संभाषणे ऐकू येत होती. वेंडिंग मशीन मधील शीतपेयांच्या कॅन्सचा घरंगळताना येणारा आवाज, बाहेर सिगारेटचा वाढता धूर सारे काही लोकांच्या सुटीच्या आनंदावर विरजण पडते की काय या भावनेच्या उद्रेकाची लक्षणे होती.
माझी सगळी माहिती ऐकून मेगनने तिच्या संगणकाच्या यंत्रणेत आमची तिकिटे शोधली. तिला सकाळी ६ वाजता न्यू ऑर्लिन्स ते फिनिक्स आणि पुढे विमान बदलून लास वेगासला जाणाऱ्या एका विमानात दोन जागा शिल्लक आहेत असे दिसले. आई बाबांचे आरक्षण वेगळ्या कोट्यातून केले होते. त्यामुळे त्यांना या जागा मिळू शकत नाहीत असे तिने सांगितले. मी एकटीने पुढे जाण्यात काहीच अर्थ नव्हता." आमच्या कोणत्याही विमानात तुम्हाला देता येतील अशा जागा उद्या संध्याकाळपर्यंत उपलब्ध नाहीत.""दुसऱ्या विमानकंपनीला विचारता का?" "दुसऱ्या विमान कंपन्यांच्या जागेसाठी तिच्या वरिष्ठांकडे विचारावे लागेल "
आमचे संभाषण नक्की काय सुरू आहे याचा अंदाज आई बाबांना होता. तिला मी सर्व पर्याय विचारले अथवा नाही याची ते खात्री करत होते. मी सार्वजनिक दूरध्वनीने घरी दूरध्वनी केला. भ्रमणध्वनीवर ती कर्मचारी आणि दुसऱ्या दूरध्वनीवर पती, असे दोन कानांना दोन दूरध्वनी लावून माझी कसरत सुरू होती.
आम्ही दुपारी चार पर्यंत जर लासवेगासला गेलो तर हॉटेल व गाडीच्या आरक्षणात किरकोळ बदल करून बाकी इतर बेत तसाच राहणार होता. विमानतळावरची गर्दी आता पांगू लागली. सर्व विमान प्रवाश्यांची व्यवस्था एका हॉटेलात केली होती. तिथे जाण्यास आता मंडळी लगबगीने निघू लागली. विमानतळावर बहुतेक सर्वांना उद्या सकाळ ते दुपारपर्यंत निघणाऱ्या विमानांवर जागा मिळाली होती असे त्यांचे चमकणारे चेहरे सांगत होते.
"आमच्या कुटुंबातील काही सदस्य आधीच लासवेगासला पोचले आहेत. आम्ही उद्या दुपारपर्यंत गेलो नाही तर इतर सर्व बेत रद्द करावे लागतील"
"ओह, तुम्हाला लग्नाला जायचे आहे"
माझे तर्खडकरी अथवा शुद्ध आमटीभात इंग्रजी ऐकून आम्ही सर्व एका लग्नाला जात आहोत असा तिचा गोड गैरसमज झाला.
जवळपास अर्ध्या तासाने आम्हा तिघांची व्यवस्था तिने दुसऱ्या एका विमानकंपनीच्या, तीन टप्प्याने लासवेगासला जाणाऱ्या विमानांवर केली.
'माझ्याजवळ हाच एक पर्याय आहे तेंव्हा तुमचा निर्णय सांगा' .मी तिला होकार दिला. दुसरीकडून दूरध्वनीवर पतीने मी तसेच करावे असे सुचवले. "उद्या सकाळी दोन तास आधी विमानतळावर या व तुमचे बोर्डिंग पास घ्या".
तिने दिलेली आरक्षणाची सर्व माहिती नीट लिहून घेऊन तिचे आभार मानून मी संभाषण संपविले.
माझा भाऊ एका तासातच लासवेगासला येऊन पोहोचणार होता. विमानात भ्रमणध्वनी बंद असल्याने त्याला ह्या घडामोडींची काहीच कल्पना नव्हती. माझे सर्व निरोप त्याला विमानातून बाहेर आला की मिळणार होते.
एका बसने विमानतळावरून आम्ही हॉटेलवर गेलो. आई बाबांची झोपमोड होऊ नये म्हणून मी दुसऱ्या खोलीतील दूरध्वनीवरून हॉटेल व कारचे आरक्षण बदलू लागले. सगळीकडे भ्रमणध्वनी कक्षेत असतो या फाजील आत्मविश्वासाने मी कोणतेही 'कॉलिंग कार्ड' घेतले नव्हते. नेमका हॉटेलमध्ये माझ्या भ्रमणध्वनीचा संपर्क जाळ्यापासून तुटला होता!
भावाशी संपर्क करता यावा म्हणून मी मध्यरात्री हॉटेल बाहेरील हिरवळीवर बसून इतर आरक्षणे बदलू लागले. डास, मुंग्या रातकिडे यांच्या सोबतीने एकटेपणा वाटत नव्हता......

माहितीजाळ्यावरून हॉटेल, कार व विमानाच्या तिकिटांचे विविध कंपन्यांतर्फे आरक्षण ही सध्या अगदी प्रचलित बाब आहे. प्रत्येक वेळी आपण काही नियम/ अटी स्वीकारून मग पुढे आरक्षण करत असतो. प्रत्येक ठिकाणी मुख्य प्रवासी म्हणून माझे नाव व इतर माहिती दिली होती. बरीच हुज्जत घातली आणि माझ्या ध्यानात आले की माझ्या भावाकरता कार किंवा हॉटेल कशाचेही आरक्षण हस्तांतरित होणार नव्हते आणि हॉटेलचे पैसे परत मिळणार नव्हते. कारण ती अट मीच मान्य केली होती!! भाऊ टॅक्सी करून हॉटेलवर गेला असता पण आता हॉटेलचे नवे आरक्षण आवश्यक होते. तेवढ्यात भावाचा दूरध्वनी आला. त्याला सर्व माहिती दिली. हॉटेलच्या आरक्षणाचा दर कळताच त्याने लासवेगास विमानतळावर उरलेली रात्र व आम्ही येईपर्यंतचा दिवस सहज घालवता येईल असे उत्तर दिले. लासवेगास हा अतिशय गजबजलेला विमानतळ असल्याने तसा तिथे राहण्यात धोका नव्हता.
जेमतेम एक दीड तास झोपून पहाटे चार वाजता आम्ही पुन्हा चेक इनच्या रांगेत हजर झालो. तुमचे तिकीट या कंपनीने दिले तिथे आधी जा, ही कागदपत्रे दाखवा, असे करा, तसे करा अशी तब्बल दोन अडीच तास माझी धावपळ सुरू होती. सारे सोपस्कार पार पडले. 'जा, सुखाने प्रवास करा' असा आशीर्वाद व बोर्डिंग पास हातात पडले. सकाळचे सात वाजत होते. सुरक्षाव्यवस्थेतून अगदी काटेकोर तपासणी झाली. सगळ्या तपासण्या पार पाडून आम्ही आमच्या विमान थांब्यावर गेलो. फलकावर आमचे विमान वेळेवर सुटणार असे दिसत होते. एवढा वेळ निवांतपणा असा नव्हता पण आता मात्र खूप भूक लागली आहे असे जाणवले. विमान कंपनीने सकाळच्या नाश्त्याकरता काही कूपने दिली होती. ती वापरावी असा विचार माझ्या मनात आला. ती घेणारे उपाहारगृह आमच्या नवीन विमान सुटणाऱ्या विमानथांब्यावर(टरमिनलवर) नव्हते. खिशातून एकही दमडी न देता नाश्ता करण्याचे माझे स्वप्न त्यामुळे अपूर्ण राहिले. असो. असे काही तरी मनाविरुद्ध झालेच पाहिजे!पैसे खर्चून आम्ही सर्वांनी कॉफी घेतली. खरं तर चहा कॉफीचे पैसे द्यायची आधी तयारी होती. पण त्या कुंपनांनी उगीच मनात वाद निर्माण केला. काही वेळाने विमानात प्रवेश करा अशी घोषणा झाली.
'आपले स्वागत असो 'असे मधाळ हसून हवाई सुंदरीने आमचे स्वागत केले. कमरेभोवती पट्टे आवळून आम्ही पुढील प्रवासाला तयार झालो. विमान धावपट्टीवर धावू लागले. काही क्षणातच त्याने आकाशात झेप घेतली.
या नंतर आणखी दोन ठिकाणी विमान बदलायचे होते, थोडादेखील उशीर पुढील सगळे बेत उधळून लावणार होता. आता ऐनवेळी सुटीच्या गर्दीत आरक्षण मिळणे खरंच अवघड होते. विचारातच आम्हा सर्वांचा डोळा लागला आणि विमान धावपट्टीवर उतरताना आम्हाला जाग आली. चला, एक टप्पा पार पडला. लगेच दूरध्वनीने घरी व भावाशी संपर्क साधला. त्यांना पुढचे विमान सुद्धा वेळेवर आहे याची कल्पना दिली. मनात शंकेची पाल चुकचुकत होती पण तसे काही घडण्याआतच आम्हाला पोटात सामावून दुसरे विमानही आकाशात उंचावले. सर्वजण डोळे मिटून जमेल तेवढी विश्रांती घेत होतो.
काही वेळाने लोकांनी खिडकीतून खाली दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वत शिखरांची छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. मी सुद्धा चटकन त्या शिखरांना माझ्या छायाचित्रकाने टिपले. पुढील प्रवासात मे- जून मध्ये त्या शिखरांवर खरंच बर्फ आहे किंवा नाही याकरता मी दूरवर दिसणाऱ्या सर्व पर्वतांवर बर्फ शोधत होते ही गोष्ट वेगळी!
विमान धावपट्टीवर उतरले. आता फक्त एक टप्पा की आम्ही सर्व लासवेगासला जाणार होतो.
त्या विमानतळावरून आमचे विमान सुटण्यास एक तास अवधी होता. विमानथांबा लोकांनी गजबजला होता. शाळाकॉलेजांच्या उन्हाळ्याचा सुटीची नुकतीच सुरुवात झाली जोती. त्यामुळे कित्येक कुटुंबे मुलाबाळांसह प्रवासाला निघाली होती. पुढील सहलीचा विचार करत आम्ही विमानात पाऊल ठेवले. लासवेगास जसे जवळ आले तसे खिडकीतून धावपट्टीच्या एका बाजूला पसरलेले विविध कसीनो आणि मोठाली हॉटेल्स दिसू लागली. हा एमजीएम ग्रॅन्ड, हा कसीनो न्यूयॉर्क अशा किलबिलाटाने लासवेगासच्या धावपट्टीवर उतरणारे आमचे आमचे विमान सजीव भासू लागले.

विमानाच्या बाहेर येताक्षणी विमानतळावर नजर जाईल तेथे सट्टाबाजीला उद्युक्त करणारी स्लॉट मशीन्स दिसू लागली. दिव्यांचा झगमगाट, रोषणाई,नाण्यांची खणखण, बियर व इतर मद्ये आणून देणाऱ्या ललना दिसत होत्या. सारे विसरून जुगारात दंग झालेले कित्येक लोक मी अचंब्याने पाहात होते!. २१ वर्षाच्या तरूणापासून तर ८० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत जणु सारे आपले नशीब अजमावायला लासवेगासला आले होते! सट्टाबाजी आणि सौंदर्याची खुली वसाहत म्हणून अमेरिकेत, नेवाडा राज्यात, वसविलेले लासवेगास जगभरात ओळखले जाते.
घरी फोन केला व खुशाली सांगितली. लगेच भावाशी संपर्क साधून त्याला आमचे सामान येते तेथे भेटण्यास सांगितले. आम्हा सर्वांची भेट झाली आणि आमचे सामानही मिळाले. आता सगळ्यांच्या नजरा होत्या ग्रॅन्ड कॅनियनकडे!
स्थानिक वेळेनुसार दुपारचे तीन वाजत होते. नकाशे पाहून मार्गाची खात्री केली. मी ग्रॅन्ड कॅनियनच्या दिशेने गाडी चालवण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने पोटपूजा करून जवळच्या गॅस स्टेशनवर(पेट्रोल पंप) कॉफी घेतली. पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा घेतला. यापुढील प्रवासात गाडीतले पेट्रोल आणि पिण्याचे पाणी याकडे लक्ष देणे आवश्यक होते. वाटते आमचा पहिला थांबा होता 'हूवर धरण'. बोलता बोलता असे लक्षात आले की कॅमेराचे सेल घेतले नाहीत. पुढील प्रवासात आणखी काय विसरले आहे याचे नवीन शोध लागणार होतेच! काही अंतरावर एक गॅस स्टेशन आले.तिथे ते सेल घेतले आणि सर्वजण हूवर धरणाकडे निघालो.
वातानुकुलीत गाडी असूनही उन्हाळा चांगलाच जाणवत होता,काचा गरम होत्या आणि गाडीत ऊन्हाचे चटके बसत होते. काळ्या रस्त्यावर चमकणारे ऊन मृगजळाचा भास निर्माण करत होते. साधारण ताशी ९० मैल अशा वेगाने मी गाडी चालवत होते. गाडीचे गतिरोधक दाबले तर गाडी पाण्यातून घसरणार नाही ना? असा विचार कित्येकदा मनाला स्पर्शून गेला.
लासवेगास मागे पडल्यावर रस्त्यावर अगदी एखादी गाडी दिसत होती. दोन्ही बाजूला नजर जाईल तिथवर वैराण, उजाड प्रदेश. खूप निरखून पाहिले की अगदी क्षितिजाजवळ उंचच्या उंच लांबलचक पर्वताच्या रांगा दिसत होत्या. खरं तर आता रस्त्यावर बरीच गर्दी असेल असा आमचा अंदाज होता. त्यामुळे आपण रस्ता चुकलो नाही ना याची दहा वेळा खात्री केली. जसे जसे हूवर धरण जवळ येऊ लागले तशी रस्त्यावरची गर्दी वाढली. चढावाचा घाटातून जाणारा रस्ता नागमोडी वळणांचा होता त्यामुळे गाडीचा वेग खूप कमी करावा लागला.
धरणाच्या आसपास सर्व गाड्या लावण्याच्या जागा (पार्कीग लॉट्स) भरल्या होत्या. बरेच पुढे गेल्यावर शेवटी एक जागा मिळाली. धरणाकडे चालण्यास सुरुवात केली. उंचावरून दिसणारा धरणाचे दृश्य सुंदर होते. फेसाळणारे निळे हिरवे पाणी आणि त्याच्या प्रवाहाचा जोर! हे धरण स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने एक उत्कृष्ट उदाहरण समजले जाते. त्याची रचना व कार्य समजवून सांगण्याकरता इथे शासनातर्फ़े सोय आहे.
धरणाच्या आजुबाजुला सगळीकडे उंच पर्वत आहेत आणि पर्वताच्या रांगेतून तसेच नागमोडी वळणे घेत वाहणारी नदी दिसते. उन्हापासून संरक्षणाची सर्व खबरदारी घेऊनही कानाला उन्हाच्या झळा जाणवत होत्या, दहा मिनीटे चालताच आम्ही सर्वजण घामाघूम झालो होतो. धरणाचे चित्रण करण्यासाठी मी चलचित्रक सुरू केला. पहाते ते काय समोर सगळीकडे अंधार दिसत होता.
तापमानातील फरकाने लेन्स वर बाष्प जमा झाले होते, त्याचे हात लावताच तयार होणारे पाण्याचे थेंब पुसूनही दोन्ही चित्रके(कॅमेरे) काम करेना. छायाचित्रांपेक्षा चलचित्रीकरणाने बघणाऱ्याला खरी अनुभूती येते. भारतात परत गेल्यावर आई बाबांना भेटायला घरी येणाऱ्या प्रत्येकाला अमेरिकेतील निसर्गाचे दर्शन घडवण्याच्या 'पुण्याला' मी मुकणार होते! चलचित्रीकरणातून माहितीपट तयार करण्याची एवढी मोठी संधी मी गमवणार होते.
अखेर थोड्या वेळाने बाष्प तयार होणे थांबले. शिवाय गडबडीत मी कोणतीतरी चुकीची कळी दाबली होती. बराच वेळ खटपट केली. अखेर सर्व अंधारवणारी चलचित्रकाची कळी सापडली. एकदाची दोन्ही चित्रके (कॅमेरे)सुरू झाली. मला चलचित्रीकरण करता आले.
आजुबाजुच्या वैराण भागातून वाहणारी ही नदी म्हणजे एक आश्चर्यच होते. खुरटी झुडपे आणि कॅक्टसशिवाय कोणतीही झाडे नजरेच्या टप्प्यात नव्हती. उन्हाचा तडाखा जबरदस्त होता. असेच ऊन पूर्ण सहलीत राहिले तर सगळ्याच स्थळांना अगदी धावती भेट द्यावी लागणार होती. हूवर धरणाचा निरोप घेऊन आम्ही ग्रॅन्ड कॅनियनचा मार्ग धरला. परतीच्या प्रवासाचा मार्ग वेगळा होता. आम्हाला तेंव्हा धरणाचे जवळून दर्शन होणार नव्हते.

ग्रँड कॅनियन भेट
पुढील चार तासाचा प्रवास वैराण भागातूनच होता. विविध आकारांचे पर्वत, दिसणाऱ्या खुरटया झुडपातील व कॅक्टसमधील वैविध्य हाच काय तो विरंगुळा होता. मातीचा रंग तांबडा पिवळा असा होता. मध्ये काही अंतरावर इंडियन विलेज किंवा इंडियन वस्तू मिळण्याची दुकाने रस्त्यालगत दिसायची. हे इंडियन म्हणजे अमेरिकेतील रेड इंडियन जमातीचे लोक. त्यांनी कलाकुसर करून विणलेल्या टोप्या, मण्यांच्या माळा आणि विविध प्रकारच्या काठ्या, प्राण्याच्या कातडीच्या शोभिवंत वस्तू व काही फळे अशांची दुकाने त्यांनी रस्त्यालगत थाटली होती. एकही पेट्रोल पंप, बर्गर किंग, मॅक्डॉन्ल्डस ही उपहारगृहे वा नेहमी आढळणारे वॉलमार्ट हे दुकान दिसले नाही. तीन तास गेल्यावर खूप दूरवर काही निळ्या जांभळ्या पर्वतरांगा दिसू लागल्या. मावळत्या सूर्याची किरणे त्या पर्वतशिखरांवर पडल्याने रंगांची होणारी उधळण मनमोहक होती.
'ग्रँड कॅनियन अमुक अमुक दिशेला आणि किती मैलांवर आहे ' अशी माहिती देणारे फलक दिसू लागले. जवळच्या गावात असणारी हॉटेल्स व उपाहारगृहे यांच्या जाहिरातीमोठ्या फलकांवर होत्या. तेथे जाणाऱ्या प्रवाश्यांना राहण्याची सोय करता यावी यासाठी त्यांचा उपयोग होतो. बाहेर अंधारू लागले होते. आम्ही आमच्या खोलीवर पोहोचलो. आंघोळ करून गावात पायी फिरायला गेलो.
मॅक्सिकन जेवणात मक्याची पोळी, एखादी चवळीसारखी उसळ, कांदा, ढोबळी मिरची, कोंथंबीर, दही , परतलेल्या इतर भाज्या व भात असा समावेश असतो. जेवणाआधी मकयाच्या पापडांबरोबर झणझणीत अशी टोमॅटो, कोथिंबीर ,लसूण आणि कांद्याची चटणी असते. त्याला 'सालसा' असे म्हणतात. भारतीय जेवणाच्या जवळचे आणि त्या गावातील खास नावाजलेले म्हणून एका मॅक्सिकन उपहारगृहात त्या रात्री जेवण केले. गावातील हौशी कलाकारांचा एक ताफा तिथे होता. त्यांचे संगीत कितीतरी वेळ कानात रेंगाळत होते. मॅक्सिकन उपहारगृहात मिळणारे 'मार्गारिटा' हे खास शौकिनांचे आवडते मद्य आहे. संगीताच्या तालावर कित्येक अमेरीकन युगुले देहभान हरपून जेवणाचा आणि मद्याचा आस्वाद घेत होती.
पहाटे उठून ग्रॅन्ड कॅनियनला सूर्योदय पाहण्याची इच्छा होती. ते शक्य झाले नाही तरी लवकर उठून आवरून तयार झालो. न्याहारी केली. जवळच असणाऱ्या एका दुकानात काही फळे, ब्रेड, जॅम आणि पाणी अशा जिनसा घेतल्या. आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. अर्ध्या तासात आम्ही ग्रॅन्ड कॅनियच्या दक्षिणी भागाचा(साऊथ रीम) टप्पा गाठणार होतो. हा प्रवासमार्ग खूप प्रेक्षणीय आहे, अशा रस्त्यांना 'सिनीक ड्राइव्ह' असेच नाव अमेरिकेत आढळते.
वळणादार नागमोडी रस्ते, काही घाट होते. तुरळक प्रमाणावर आढळणाऱ्या फळबागा होत्या. काही वेळा शेजारी येणारे पर्वत होते. तर कधी दूर दिसणाऱ्या निळ्या जाभंळ्या तांबड्या डोंगर रांगा पूर्ण रस्त्याभर आमचा पाठलाग करीत होत्या. ह्याच ग्रॅन्ड कॅनियनच्या रांगा. ग्रँड कॅनियन राष्ट्रीय उद्यान अरिझोना राज्यातील कोलोरॅडो पठारावर (प्लॅटूवर) आहे. अमेरीकेच्या त्या भागाचे वैशिष्ट्य असलेल्या उंचवटे व घळयांनी हा प्रदेश सजला आहे. पाण्याच्या प्रवाहानी दगडांचे सुळके तयार झाले आहेत. खूप उंचीवरील प्रदेशात जंगले आहेत.कमी उंचीवरील प्रदेशात वाळवंटी घळईंच्या रांगाच रांगा आहेत. ग्रँड कॅनियनमधील सर्वात खोल भागाची खोली साधारण ६००० फूट आहे.
अमेरीकेतल्या सर्व राष्ट्रीय उद्यानात काही प्रवेश शुल्क आकारतात. सर्व उद्यानात वर्षभर उपयोगात आणता येईल असा एक 'पास' मिळतो. वाहनचालकाची माहिती दाखवून त्याच्या कुटुंबियाना वापरता येईल असे त्याचे स्वरूप असते. आम्ही तो पास व उद्यान्याची माहिती पत्रके घेतली. (टीप पहावी)
ग्रॅन्ड कॅनियनचा सर्व परिसर गजबजला होता. सगळीकडे निळ्या, जांभळ्या, तांबड्या रंगाच्या पर्वत रांगा दिसत होत्या. सूर्यकिरणे त्यांच्यावर पडून विविध रंग चहूबाजुला फेकीत होती. डोंगरांचे विविध आकार दिसत होते. त्या आकारांवरून त्यांना नावे दिली होती. त्यातील काही नावे 'ब्रम्हा टेंपल', 'विष्णू टेंपल' आणि 'शिवा टेंपल' अशी आहेत. ठिकठिकाणी कठड्यांची सोय करून छायाचित्रीकरण करता येईल अशी बांधणी होती. मोठे माहितीफलक होते. त्यावर विविध शिखरांची उंची, घळईच्या भागाची खोली, पर्वतात सापडणारी खनिजे, दगडांचे प्रकार यासर्वांची शास्त्रीय माहिती दिली होती.
ग्रँड कॅनियनचा दक्षिण भाग समुद्रसपाटीपासून साधारण ७००० फूट उंचीवर आहे. दूर्बीणीने दूरवर डोंगरातून घळया दिसत होत्या. त्यांच्या कडेने जाणारा एक पाण्याचा प्रवाह वाहत होता. तो प्रवाह म्हणजे कोलोरॅडो नदी. ही नदी कॅनियनच्या काही भागातूनच दिसते. कॅनियनच्या वरच्या भागापासून थेट नदीपर्यंत जाऊन व तसेच वर चढून येण्यास साधारण दोन दिवस लागतात. तसे करणारी अगदी तरबेज मंडळी पहाटेच खाली उतरण्यास सुरूवात करतात. नदीकाठी रात्री मुक्काम करण्यास पूर्वपरवाना लागतो. अशी माहिती आम्हाला मिळाली.
आम्ही 'डेसर्ट विह्यू ड्राईव्ह', 'रीम ट्रेल' नावाच्या पायवाटांनी जवळ जवळ सर्व दक्षिण भाग बघितला. तसेच काही भाग गाडीने प्रवास करून आणि ठराविक पॉइंटचे दर्शन घेऊन आम्ही बघितला. दुपारी सूर्यप्रकाशात कॅनियनचे रंग थोडे फिकट दिसतात. सकाळी आणि संध्याकाळी ते खूप चमकदार असतात. डोक्यावर व दूर समोर निळ्या रंगाच्या विविध छटा दाखवणारे आकाश दिसते. त्याच्या पुढे नारिंगी, तांबडे, जांभळे, निळे, हिरवे अशा विविध रंगछटांची वळ्यावळ्यांची मखमल पांघरून उभ्या पर्वतशिखरांच्या रांगाच रांगा! यासर्वांमध्ये डोकावणारी काही तुरळक झुडपे आणि चिमुकली कॅक्टसची फुले! हे दृश्य पुन्हा पुन्हा पाहूनही मनाचे समाधान होत नव्हते. सगळे छायाचित्राच्या व फितीच्या स्वरूपात साठवले तरी कमीच होते.
दुर्बीणीतून कोलेरॅडो नदीचा प्रवाह आणि डोंगरातील पायावाटा दिसत होत्या. तिथेच बराच वेळ राहावे असे वाटत होते. ग्रँड कॅनियनला डोळ्यात साठवून आम्ही पुढील प्रवासास निघालो. वाटेतून एका बाजुने एक दीड तास त्याच तांबडया जांभळ्या पवर्तरांगा आणि दूरवर खोल वाहणारी नदी दिसत होती. आता आम्हाला वेध लागले होते"मॉन्युमेंट व्हॅलीचे".

मॉन्युमेंट व्हॅली
अरिझोना आणि उटा या राज्याच्या सीमेवर मॉन्युमेंट व्हॅली आहे. हा प्रदेश नवाहो इंडियन जमातीच्या अधिकारात आहे. वालुकाश्माने एके काळी हा प्रदेश व्यापला होता. त्यांच्या हजारो फूट उंच विविध आकाराच्या अवशेषांनी ही मोन्युमेंट व्हॅली तयार झाली आहे. लाल तांबड्या एकमेकांपासून दूर उभ्या विविध आकृत्या वाळवंटी प्रदेशात आपले लक्ष वेधतात. चित्रपट, जाहिराती, पर्यटन व सहलींच्या पुस्तकात ही निसर्गनिर्मित शिल्पे कित्येकांनी बघितली असतील. प्रत्यक्षात त्यांचे रंग तसेच चमकदार आहेत.
बाहेरच्या मोठ्या रस्त्याने(हायवे यूएस 163 AZ and यूएस 183 utah )जाताना बरीच शिल्पे बघता येतात. साधारण १७ मैल कच्च्या रस्त्याने 'नवाहो' जमातीच्या ह्या आरक्षित जागेतून फिरताना त्यांचे जवळून निरीक्षण करता येते. त्या शिल्पांच्या आकारांवरून त्यांना नावे दिली आहेत.
उन्हाचा चटका खूप जाणवत होता. रखरखीत वाळवंटात वाऱ्याने तांबड्या धुळीचे लोट उडत होते. काही आकार एवढे मोठे आहेत की त्यांचे छायाचित्र 'पॅनोरॅमिक व्हू' शिवाय घेता येणे शक्य नाही.
एकमेकांपासून काही अंतरावर उभे पण सलग्न असे तीन सुळके दिसतात. त्यांचे नाव 'थ्री सिस्टर्स' असे आहे. थोरली आणि मधली साधारण सारख्या उंचीच्या बहिणी असाव्यात. त्यांची धाकटी बहीण रुसून जरा दूर उभी आहे असे त्यांच्याकडे पाहिले की भासते. दोघीजणी आता धाकटीची कशी समजून घालावी याची सल्लामसलत करत आहेत अशा विचारात दिसतात.!
काही आकारांनी दिलेली नावे मजेशीर आहेत. अर्थात ही नावे खूप पूर्वी संशोधकांना जसे आकार दिसले त्यानुसार दिली आहेत. माहिती केंद्राजवळ दिसणारा एक भला मोठा उंचवटा म्हणजे 'एलिफंटस् बट्' ! हा आकार अजस्त्र व उंच आहे. एखादी शेपटी असावी असाही भास होतो त्यामुळे त्याला असे नाव दिले असावे. असेच 'कॅमल बट्' सुद्धा आम्ही पाहिले.
माहिती केंद्राजवळून 'इस्ट आणि वेस्ट मिटन बट्स' असे दोन आकार लक्ष वेधतात. कच्च्या रस्त्यावरून गाडीने जाऊन आम्ही प्रत्येक आकार पाहत होतो आणि त्यांचे छायाचित्रण करत होतो.
निळ्या आकाशात काही पांढरे ढग रेंगाळताना दिसत होते. उन्हाची चमकती किरणे त्यावर पडत होती. ह्या आकृत्यांचे लाल तांबडे रंग अधिकच उठावदार होत होते. या प्रदेशात तांबडी लाल भुसभुशीत माती आहे. सर्व दूर काही अंतरावर पसरलेले असे उंच पसरट आकार आणि त्यांच्या जवळची खुरटी हिरवळ असे दृश्य वारंवार दिसत होते. आम्ही प्रत्येक आकाराकडे पाहून याचे नाव काय असावे असा अंदाज करत होतो.
बरेच दूरवर 'ईगल मेसा' असा खूप पसरट आकार दिसला. त्याची भव्यता पाहून डोळे दिपले. गेली कित्येक वर्षे वातावरणाचा परिणाम होत असूनही ह्या आकृत्या फारशी पडझड न होता टिकून आहेत. काही ठिकाणी आकाराच्या पायथ्याशी थोडे घरंगळलेले दगड व भुसभुशीत माती दिसते. पायथ्याशी साठू लागलेला दगडामातीचा थर कालांतराने वाढून नवीन आकार निर्माण करतील असेही मनात आले.
प्रत्येक वेळी गाडीतून चढ उतर करत होतो. त्यावेळी इतर गाड्यांमुळे उडणाऱ्या धुळीने आम्हाला तांबड्या रंगाने माखले होते. इतर सहप्रवाशांची अशीच स्थिती होती. 'ओर्गन' च्या आकाराचा एक मोठा उंच दगड ह्या व्हॅलीत आहे. त्याचे नावच आहे 'ओर्गन रॉक'.
'मॉन्युमेंट व्हॅली' सारखीच शिल्पे पुढे बराच काळ रस्त्यावर दिसतात. पण जी भव्यता आणि विविधता ह्यांमध्ये आहे तेवढी इतर ठिकाणी दिसली नाही. त्यापैकी 'मॅक्सिकन हॅट' अशा नावाचे शिल्प खरच आश्वर्य वाटावे असे आहे. एखाद्या माणसाने एक मोठी 'टेक्सास स्टाइल' टोपी (हॅट) घातली आहे, अशी एक आकृती वाळवंटात तयार झाली आहे. माणसाचे डोके असावे असा एक गोलाकार दगड आणि त्यावर मोठा आडवा गोलाकार दगड अशी त्याची रचना आहे. हवामानाचा परिणाम किंवा मोठे वादळ अशा कोणत्याही कारणांमुळे डोक्याच्या आकाराचा दगड पडू शकतो. असे झाले तर ते शिल्प काळाच्या पडद्याआड जाण्यास वेळ लागणार नाही.
साधारण तासाच्या अंतरावर आणखी काही आकार/शिल्पे आहेत. त्या भागाला 'व्हॅली ऑफ गॉड्स' असे नाव आहे. त्या भागात काही आकृत्यांना मंदिरासारखा आकार दिसला. एक आकृती ध्यानस्थ माणसासारखी दिसत होती. विविध आकृत्या बघत असताना वातावरण ढगाळ झाले होते. आम्ही ब्राईस कॅनियनकडे जायला सुरुवात केली. परतीचा रस्ता मॉन्युमेंट व्हॅलीहूनच होता. तेंव्हा मॉन्युमेंट व्हॅलीचे ओझरते दर्शन घेऊ असा विचार मनात आला.
दुपारचे चार वाजत होते. आम्ही मॉन्युमेंट व्हॅलीजवळ येत असतानाच जोराचा वारा वाहू लागला. लाल तांबड्या मातीचे लोट रस्त्यावर दिसू लागले. त्या निर्जन भागात रस्त्यावर एखादीच गाडी होती. हे नक्की कोणते वादळ आहे ते कळण्यास मार्ग नव्हता. वाऱ्याचा जोर एवढा होता की गाडी हालत होती. समोरचे अंधुक दिसत होते त्यामुळे गाडी चालवणे अशक्य होते. अंधारून आले होते. काही मिनिटातच जोराच्या पावसास सुरुवात झाली.
साधारण पंधरा वीस मिनिटाच्या त्या निसर्गाच्या रौद्र रूपाने आम्ही निःशब्द झालो होतो. पावसामुळे धुळीचे लोट मावळले. त्यामुळे गाडी चालवण्यास सुरुवात केली. काही तासातच आम्ही रणरणते ऊन, जोराचे वादळ, मुसळधार पाऊस असे विविध अनुभव घेतले होते. हवेत छान गारवा आला होता. ब्राईस कॅनियन जवळ आम्ही एका अमेरिकन कुटुंबाच्या घरी 'ब्रेड ऍन्ड ब्रेकफ़ास्ट' अशा पद्धतीनुसार रहाणार होतो. ते ठिकाण अजून ५ तासाच्या प्रवासावर होते. काही वेळानंतर छान संधिप्रकाश होता. काही गावात शेती, फळबागा दिसत होत्या. सगळा रस्ताभर दूरवर पर्वतांच्या विविधरंगी रांगा दिसत होत्या. ह्या रस्त्याला सुद्धा' सिनीक हायवे' असे नाव होते.
आम्ही ब्राईस कॅनियन जवळच्या गावात पोहोचलो. तोवर रात्रीचे साडे नऊ झाले होते. एका हॉटेलात आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणाची चौकशी केली. आमच्या यजमान कुटुंबाला फोन केला. आमच्या जवळच्या रस्त्याच्या खाणाखुणांची खात्री केली. आम्ही थकलो होतो, अंधारात रस्त्याची नावे दिसेना. अर्धा तास भटकलो तरी घर सापडेना. शेवटी तशा प्रकारचे दुसरे 'ब्रेड ऍन्ड ब्रेकफ़ास्ट' चालवणाऱ्या एका अमेरिकन कुटुंबाच्या दारावर टकटक केले. बाहेर चांगलाच गारठा होता. त्या आजोबांनी त्यांची गाडी सुरू केली. आम्हाला त्यांच्या मागे येण्यास सांगितले. दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती. अशा प्रकारची मदत ते एकमेकांना नेहमी करतात अशी माहिती त्यांनी दिली. अखेर त्या अमेरिकन आजोबांच्या मदतीने आम्ही इच्छित स्थळी गेलो. त्यावेळी माणुसकीच्या दर्शनाने आम्ही भारावलो होतो. सत्तरीच्या जवळची काही जोडपी आपल्या घरात अशी पाहुण्यांची सोय करतात. नोकरचाकराविना सगळी कामे करतात. त्यातून आपले उत्पन्न मिळवतात. आजोबा आजींनी सकाळी सात वाजता नाश्ता तयार असेल असे सांगितले. ऊबदार दुलईत आम्ही केंव्हा झोपलो ते कळलेच नाही. सकाळी जाग आली तेंव्हा उन्हाच्या किरणात ब्राईसच्या रांगा चमकत होत्या.

ब्राईस कॅनियन
जून महिना सुरू होत होता तरी बाहेर तापमान ३५डिग्री फॅ. होते. बरोबर घेतलेले लांब बाह्यांचे कपडे आणि स्वेटर्स चढवले होते तरीसुद्धा गारवा जाणवत होता.
यूटा (दक्षिणेकडे याचा उच्चार उटा असा ऐकला आहे)राज्यात असलेला ब्राईस कॅनियन त्याच्या 'ऍम्फिथिअटर्स' करता प्रसिद्ध आहे. घोड्याच्या नालेच्या आकाराचे असे अनेक ऍम्फिथिअटर्स एकमेकालगत पठारावर तयार झाले आहेत. जमिनीची धूप व वातावरणाच्या परिणामाने असे अनेक आकार निर्माण होतात. त्यामुळे रंगीबेरंगी असे चुनखडक(लाईमस्टोन), वालुकाश्म(सॅन्डस्टोन) आणि मुरूमाचे दगड विविध आकारात बदलले आहेत.काही रंगीबेरंगी उभट आणि वलीय सुळके आहेत. तर काही पसरट (फीन्स)शिखरे आणि इतर एकमेकात गुंतलेले आकार जागोजागी तयार झाले आहेत.
ब्राईस कॅनियन पाहण्यासाठी छोट्या पायवाटा आहेत. ह्या सर्व विविध आकारांना जवळून पाहता यावे म्हणून अनेक ठिकाणी विशेष जागा तयार केल्या आहेत. पायवाट उंचावरून सुरू होते. तयार झालेल्या विविध आकारांच्या पायथ्यापर्यंत अनेक दिशांनी जाते. ह्याच छोट्या पायवाटा (ट्रेल्स).
एका ठिकाणी आम्ही उभे राहिलो. नजर जाईल तेथे गोलाकार पसरलेले गुलाबी, लाल, तांबडे, जांभळे असे नानाविध रंगाचे व आकारांचे सुळके दिसत होते. काही वळ्यावळ्याचे होते, काही ओबडधोबड होते तर काही पसरट होते. काही सुळके अणकुचीदार होते. काही वळ्यांनी एकमेकांत अधिकच गुंतलेले. अशा ह्या वळणावळणाचे सुळक्यातील पहिले वळण किंवा वलय कुठे असावे ते शोधताना नजर खाली घळईत कितीतरी फूट खोलवर जात होती.
आम्ही उभे होतो ते एक मोठे 'ऍम्फिथिएटर' होते. ह्या जागेचे वैशिष्ट्य असे की तुम्ही गोलाकार नजर टाकली की तुम्हाला सभोवती हे विविध आकार दिसतात. तुम्ही गोलाकार चित्रपटगृहात बसले आहात अशी कल्पना करा. अगदी वरच्या रांगेपासून बघितले असता जशा खालच्या रांगेतल्या खुर्च्या दिसतात तसेच अशा आकारांचा भलामोठा पट्टा किंवा समूह जास्त उंचीवरून कमी उंचीकडे जातो आहे असे भासते. असे अनेक पट्टे आम्हाला दिसत होते.
ब्राईस कॅनियनच्या काही भागांची उंची समुद्रसपाटीपासून साधारण ६००० ते ९००० फूट आहे. त्यामुळे चढावावर धाप लवकर लागते. सर्व वलीय सुळके जवळून पाहता यावे म्हणून आम्ही एक पायवाट निवडली. उत्साहाने आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. वेगवेगळ्या सुळक्यांचे रंग आणि वैशिष्ट्ये बघत होतो. जेवढी छायाचित्रे घेतली तेवढी कमीच वाटत होती. सगळे पाहण्याच्या नादात आम्ही बरेच अंतर उतरून गेलो. माती भुसभुशीत होती. उतरताना वेग कमी राहावा या प्रयत्नात गुडघ्यावर जोर येत होता. वर चढून येताना मात्र आमची दमछाक झाली होती. त्याचा एक फायदा झाला तो म्हणजे आम्हाला थंडी वाजणे कमी झाले होते. पुढे त्याच दिवसात झायन कॅनियनवर आणखी एक मोठी पायवाट चढायची होती त्यामुळे आम्ही ब्राईसमधील 'हायकिंग' आवरते घेतले. आमच्या बरोबर अमेरिकन आणि इतर एशियन सहप्रवासी खूप होते. त्यात अशा पायवाटांवर चढ उतर करणाऱ्यात फक्त अमेरिकनांचा अग्रक्रम होता. क्वचित एखादा भारतीय विद्यार्थ्यांचा गट अशा मोहिमेत दिसत होता. हीच गोष्ट मला माझ्या आधीच्या सहलीतही प्रकर्षाने जाणवली होती.

No comments: